कोल्हापूर : सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलेशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी येथील डॉक्टरवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. संतोष मुरलीधर वाघुले (वय ४६, रा.  कावळा नाका) असे  संशयित डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणाची सखोल  चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन रेडीऑलॉजिस्ट संघटनेने बुधवारी पोलिसांना दिले.

पीडित महिलेवर जानकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तेथील डॉक्टरांच्या सल्लय़ाने ती पहिली सोनोग्राफी करून दुसऱ्या सोनोग्राफी करिता १९ नोव्हेंबर रोजी महिला सासऱ्यांना घेऊ न डॉ. वाघुले यांच्याकडे गेली.

तेव्हा डॉ. वाघुले याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, अशी पीडित महिलेची तक्रार आहे.  घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित महिला २१ डिसेंबरला शाहुपुरी पोलीस ठाण्यात डॉ. वाघुले याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र शाहुपुरी पोलिसांनी  तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.

मुख्यमंत्री कार्यालयात तक्रारीनंतर दखल

संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई, युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांना याची माहिती दिली. देसाई यांनी संबंधित महिलेची तक्रार घेण्यास शाहुपुरी पोलीस टाळाटाळ करत आहेत, अशी तक्रार मुख्यमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे ईमेल द्वारे केली. या प्रकारची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तत्काळ डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी वसूल करण्यासाठीच  खोटा गुन्हा

नामवंत रेडिऑलॉजिस्ट डॉ. संतोष वाघुले त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठीच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. जाणीवपूर्वक  त्यांची बदनामी केली जात आहे.  या प्रकाराने डॉ. वाघुलेंना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल  चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन रेडीऑलॉजिस्ट संघटनेने बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले.

Story img Loader