धुळे – एलआयसी किंग राजेंद्र बंब याच्याविरोधात अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अवैध मार्गाने जमवलेल्या मोठ्या रोकडसह सोने, चांदी, विदेशी चलन, खरेदी खते, फिक्स डिपॉझिट पावत्या, असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर धुळे जिल्हा पोलिसांनी अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांविरुद्ध तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन नागरिकांना केले. यानंतर धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात राजेंद्र बंब याच्यावर ३ गुन्हे दाखल झाले. आता धुळे शहरातील ट्रॅव्हल्स मालकाला २ लाख रुपये व्याजाने देऊन त्यांच्याकडून तब्बल २२ लाख रुपये वसूल केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात आरोपीने २२ लाख वसूल करून पुन्हा ११ लाखांची खंडणी मागितली. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील साईराज टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक निलेश श्रीराम पवार यांना व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्यांना व्याजाने पैसे देणाऱ्या गणेश बागुल यांच्याकडून २ लाख रूपये व्याजाने घेतले.
नंतरच्या काळात पीडित निलेश पवार यांनी घेतलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून एकूण २२ लाख रुपयांची परतफेड केली. त्यानंतरही आरोपी निलेश हराळ व वाल्मिक हराळ यांनी व्याज आकारणी सुरूच ठेवली. तसेच पीडित निलेश पवार यांचे दुकान नावावर करून घेतले. तसेच दुकान परत मिळण्यासाठी पुन्हा ११ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. यानंतर पीडित पवार यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
निलेश पवार यांनी व्यवसायासाठी २ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपी गणेश बागुल याच्याकडून १० टक्के व्याजदराने २ लाख रूपये घेतले. त्यानंतर त्यांनी लाखो रुपयांची परतफेड केली. त्यानंतरही आरोपी गणेश बागुल याने पैशांसाठी तगादा लावला आणि कुटुंबातील लोकांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी निलेश पवार यांनी आरोपी निलेश पांडुरंग हराळ याच्याकडून २ लाख रूपये व्याजाने घेतले. त्यानंतर पवार यांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने गणेश बागुल व निलेश हराळ यांना पैसे देणे अशक्य झाले नाही. त्यावेळी गणेश हरळ याने पीडित निलेश पवार यांची स्विफ्ट कार (MH 18 AJ 2256) दमदाटी करून घेतली.
दरम्यान, आरोपींनी पवार यांचे दुकानही स्वतःच्या नावावर करून घेतले. यानंतर आरोपींनी दुकानाचे कागदपत्रे परत हवे असतील, तर ११ लाख रूपयांची अशी मागणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात निलेश पवार यांनी तक्रार दाखल केली असून दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला आहे.
धुळे शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८५, ३८७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम ३९ प्रमाणे गणेश रमेश बागुल, निलेश पांडुरंग हराळ व वाल्मिक हराळ यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत, अशी माहिती धुळे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.