येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी या संस्थेत २००९ ते २०११ या कालावधीत अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि इतर १६ जणांनी सत्तेचा व अधिकाराचा दुरूपयोग करून तब्बल १०३ कोटी ९३ लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या सूत गिरणीचे सर्वेसर्वा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास पाटील यांचाही संशयितांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात सहकारी संस्थांमधील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत असताना काँग्रेसच्या बडय़ा राजकीय नेत्याच्या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या निकालाची माहिती याचिकाकर्ते नामदेव पाटील यांनी दिली. तालुक्यातील मोराणे येथील जवाहर शेतकरी सूत गिरणी ही गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांनी गाजत आहे. संस्थेत कामगार संघटना स्थापन करण्यास मज्जाव करणे, शेतकरी सभासदांचा कित्येक वर्ष एक किलोही कापूस खरेदी न करता शासनाची करोडो रुपयांची मदत लाटणे, कामगारांना कमी करून बालकामगारांची भरती, संस्थेच्या यंत्रणेची चोरी करून स्वत:च्या खासगी संस्था उभ्या करणे असे आरोप आहेत. सभासद नामदेव तोताराम पाटील यांनी संस्थेचे आर्थिक तपासणी अहवाल मिळवून विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. या अनुषंगाने नामदेव पाटील यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी २००९-११ या कालावधीत निकृष्ट कापूस विक्री, मर्जीतील व्यापाऱ्यांना कापूस विक्री, जाहिरात न देता कापूस विक्री, उधारीने सूत विक्री, सूताचे आगाऊ सौदे, अतिरिक्त पैशांची उधळपट्टी या माध्यमातून हा गैरव्यवहार झाल्याची तक्रार अर्जदाराने केली होती. या अर्जावर युक्तीवाद होऊन न्यायालयाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास पाटील, विद्यमान अध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष युवराज चौधरी, संचालक प्रमोद जैन, रामकृष्ण उपाध्ये, जितेंद्र देवरे, अविनाश पाटील, हिम्मतराव देवरे, संतोष पाटील, संभाजी पाटील, बाजीराव पाटील, पुंडलीक माळी, मधुकर गर्दे, बुधा पाटील, बापू नेरकर, प्रतिभा शिंदे, अंजनाबाई पाटील आणि कार्यकारी संचालक अशोक संगप्पा नन्ना यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधितांविरोधात फसवणुकीसह वेगवेगळ्या कलमांन्वये धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा