अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीर वानखेडेंच्या नावे आहे बारचा परवाना; उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात वाशीमधील ‘त्या’ रेस्ट्रॉ-बारचा उल्लेख

आरोपांनुसार, १९९६-९७ मध्ये वय १८ पेक्षा कमी असल्याने करार करण्यास पात्र नसतानाही समीर वानखेडेंनी ठाण्यातील सद्गुरु बार आणि रेस्तराँच्या करारनाम्यात स्टॅम्प पेपरवर आपलं वय लपवलं होतं. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलचा परवाना आधीच रद्द –

दरम्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारीला समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. वानखेडे यांनी आपलं वय चुकीचं दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला होता.

समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा जो परवाना होता ते सद्गुरु बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता. आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.

समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण काय?

मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडेंनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचं स्पष्ट केलं होतं. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले होते. “यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,” असं वानखेडे म्हणाले होते. मात्र वयाच्या मुद्द्यावरुन हा परवाना रद्द करण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir filed against irs officer sameer wankhede for forgery in thane sgy