हिंगोली येथे दुसरा ‘ओबीसी एल्गार मेळावा’ पार पडला. यावेळी ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांना लक्ष्य केलं. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही मनोज जरांगे-पाटलांवर टीका केली. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? असा सवाल बबनराव तायवाडेंनी जरांगेंना विचारला. तसेच ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा, असं चितावणीखोर वक्तव्यही तायवाडे यांनी केलं होतं.
बबनराव तायवाडे यांच्या विधानानंतर त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (३० डिसेंबर) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा-ओबीसी वाद सुरू असता तायवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विकी भगवानराव उरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हिंगोली पोलीस तायवाडे यांच्याविरोधात काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा- “…तर छगन भुजबळ मुख्यमंत्री बनतील”, मराठा-ओबीसी वादावर बच्चू कडूंचं सूचक विधान
बबनराव तायवाडे नेमकं काय म्हणाले होते?
मनोज जरांगेंवर टीका करताना बबनराव तायवाडे म्हणाले, “तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करता. आमच्या नेत्याला ( छगन भुजबळ ) शिवीगाळ करता. पण, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आमच्या नेत्याकडे बघणाऱ्याचा डोळा काढण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. त्यामुळे कुणी तशी हिंमत करू नये. आमची लायकी काढत आहात. यांना आमची लायकी काढण्याचा अधिकार कुणी दिला? ओबीसी, एससी, एसटी या तीन जातींचा जरांगे-पाटील अपमान करत आहे. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? लायकी काढण्याची हिंमत कराल, तर महाराष्ट्रात फिरणे बंद करू.”
“आतापर्यंत आम्ही गप्प होतो. शांत पद्धतीनं जगणारे आम्ही लोक आहोत. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. ४०० जातींचे ६० टक्के लोक महाराष्ट्रात आहेत. आमचा अपमान कदापिही सहन करणार नाही,” असा इशारा तायवाडे यांनी दिला होता.