सांगली : मिरजेतील औद्योगिक वसाहतीनजीकच्या शंभर फुटी रस्त्यावरील प्लास्टिक गोदामाला बुधवारी भीषण आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्लास्टिक भंगारामुळे आग उशिरापर्यंत धुमसत होती.
मिरज औद्योगिक वसाहतीच्या सीमेवर शंभर फुटी रस्त्यालगत अमन प्लास्टिक गोदाम आहे. या ठिकाणी टाकावू प्लास्टिकपासून वस्तू तयार करण्यात येतात. यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक भंगार जमा करून ठेवण्यात आले आहे. संबंधित कारखान्या शेजारी रस्त्यावरील कचरा पेटवण्यात आला होता अशी माहिती मिळत असली तरी याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कचर्याच्या आगीमुळे प्लास्टिक कारखान्यातील प्लास्टिकला लागली. त्यामुळे अल्पावधीतच प्लास्टिक कारखान्यातील प्लास्टिकला देखील ही आग लागली.
संबंधित कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असून या प्लास्टिकला आग लागली आहे. महापालिकेच्या आणि औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे आगीचे लोट परिसरात पसरले होते. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे तसेच कंपनीत प्लास्टिक असल्यामुळे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या आगीने कोणालाही इजा झालेली नाही.