सातारा: साताऱ्यातील चवनेश्वर (ता. कोरेगाव) येथे मिरवणुकीदरम्यान उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे भीषण आग लागून डोंगरावरील शेकडो एकरवरील निसर्ग संपदा जळून खाक झाली. या आगीत वनसंपदा, झाडेझुडपे व जैवविविधता जळून खाक झाली. करंजखोप (कोरेगाव) येथे घडलेल्या या घटनेनंतर दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर स्थानिक युवकांनी ही आग आटोक्यात आणली.

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. उत्तर कोरेगावात करंजखोप चवनेश्वर (ता. कोरेगाव) गावात वाई व कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर मोठा डोंगर आहे. या परिसराला चवनेश्वरचा डोंगर म्हणून मोठी ओळख आहे. या डोंगरावर वनविभाग व गावोगावच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात देशी फळ झाडे व औषधी झाडांची लागवड केली होती. दरवर्षीच्या दुष्काळात जमेल तसे पाणी घालून ही निसर्गसंपदा वाढविली आणि जतन केली होती. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान फटाके उडवले गेले आणि त्यांच्या ठिणग्यांमुळे जवळच्या सुक्या गवताने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती डोंगरावर मोठ्या प्रमाणावर पसरली.

डोंगरावर मोठ्या प्रमाणात सुकलेले गवत, झाडेझुडपे असल्यामुळे आग वेगाने फैलावत गेली. दुर्गम भाग आणि रात्रीची वेळ असल्याने अग्निशमन दलाच्या कामात अडथळे निर्माण झाले. या गंभीर परिस्थितीत करंजखोप येथील पिलाजीराव धुमाळ, ललित धुमाळ, इंद्रजित धुमाळ, नामदेव धुमाळ, शिवराज कुंभार, बाळू कोळी, प्रशांत धुमाळ, गोट्या भोसले, अनिकेत धुमाळ, सिराज शेख, संग्राम धुमाळ, प्रशांत बोडरे, दीपक फरांदे यांच्यासह फॉरेस्ट ऑफिसर चंदरीका लोहार, राऊत साहेब, गणेश जगताप यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रंदिवस झटत महत्त्वाची भूमिका बजावली.

या युवकांनी पारंपरिक साधने, पाण्याच्या टाक्या आणि फांद्या यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून या सर्वांचे विशेष कौतुक केले जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मिरवणुकीदरम्यान फटाके उडवून अशी आपत्ती निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वनविभाग आणि पोलीस यंत्रणा संयुक्तरीत्या दोषींवर कारवाई करणार आहेत. अशा प्रकारच्या मिरवणुकांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.