शिवसेना शहरप्रमुखाचे पितळ उघडे, तिघांना अटक
कोपरगाव येथील शिवसेना शहरप्रमुखावरील गोळीबार हा बनाव असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी चारच दिवसांत या कथित गोळीबाराचा छडा लावून हे पितळ उघडे पाडले. या शहरप्रमुखाने अन्य लोकांना बरोबर घेऊन संगनमतानेच स्वत:वर गोळीबाराचा बनाव केला होता. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी या शहरप्रमुखासह चौघे फरार आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी शनिवारी नगरमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी कोपरगावचा शिवसेना शहरप्रमुख भारत मोरे याने स्वत:वर गोळीबार झाल्याचे व त्यातून आपण बचावल्याचा बनाव रचला होता, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. या प्रकरणी भरत मोरे, साजिद पठाण या दोघांसह युसूफ आजम शेख, इरफान शेख, विजय इस्ते, रवींद्र रावल व तौफिक सत्तार या सात जणांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील युसूफ शेख, विजय इस्ते व तौफिक सत्तार या तिघांना अटक करण्यात आली असून, मोरे याच्यासह अन्य चौघे फरारी आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, की कोपरगाव येथील शिवसेनेचा शहरप्रमुख भारत मोरे याने दि. ३१ ऑगस्टला रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्याला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली, तसेच हल्लेखोरांना आपल्यावर गोळीबार केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. या मारहाणीत मोरे याच्यासह साजिद पठाण हाही जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. मोरे याने आधीच बेकायदेशीर वाळू उपशाविरुद्ध मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच तालुक्यातील वाळू तस्कारांनी आपल्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याचे त्याने या फिर्यादीत म्हटले होते. या प्रकाराने जिल्हय़ात खळबळ उडाली होती. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली एक व नंतर सर्वपक्षीय मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला होता. सर्वानीच पोलिसांना दूषणे देत या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली होती. लोखंडे यांनी चार दिवसांत तपास न लागल्यास ‘जिल्हा बंद’चाही इशारा दिला होता. गेले तीन-चार दिवस हे प्रकरण गाजत होते.
पोलिसांनी चारच दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला, मात्र त्यात हा सगळा प्रकारच बनावट असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले, की धागेदारे मिळाल्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनीच या बनावाची कबुली दिली. मोरे यानेच संगनमताने स्वत:वर गोळीबाराचे कुंभांड रचले. त्यानेच हा कट आखला. त्यानुसार विजय इस्ते याने तौफिक सत्तार (राहणार श्रीरामपूर) याच्याकडून पिस्तूल मिळवले. याच पिस्तुलातून गोळीबाराचा बनाव करण्यात आला. मोरे याने फिर्यादीत म्हटले असले तरी यातील एकाचाही वाळू तस्करीशी संबंध नाही, असा निर्वाळा डॉ. त्रिपाठी यांनी दिला. यातील काहींची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी शनिवारी मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या तो फरार आहे. तो सापडल्यानंतर यातील आणखी काही गोष्ट उघडकीस येतील, असे ते म्हणाले.

Story img Loader