हैदराबादहून मालेगावकडे मांस घेऊन निघालेल्या पाच मालमोटारी आग लावून पेटवून देण्यात आल्या. पाचही मालमोटारी जळून खाक झाल्या. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील गारज गावाजवळ हा प्रकार घडला. शिऊर पोलिसांत या बाबत संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्ह्य़ाची कारवाई सुरू होती. या प्रकारामुळे मांस वाहतूक करणाऱ्या मालमोटारींचे चालक सर्द झाले. संध्याकाळपर्यंत आग पूर्णपणे विझली नव्हती.
आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या पाचही मालमोटारी हैदराबाद येथील होत्या. हैदराबाद शहरात जनावरांची चरबी व हाडे घेऊन या गाडय़ा मालेगावच्या दिशेने निघाल्या होत्या. गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहरातून मांस घेऊन बाहेरगावी मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. शनिवारीही असाच प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच गारज गावाजवळील ढेकू नदीवरील पुलावर संतप्त नागरिकांनी शिऊरच्या दिशेने जात असलेल्या पाचही गाडय़ा अडवून पेटवून दिल्या. आगीत पाचही गाडय़ा जळून खाक झाल्या. या प्रकारामुळे परिसरात तणाव वाढून वाहतूकही थांबवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
शुक्रवारी रात्री उशिरा पढेगाव कत्तलखान्यात पाच मालमोटारींमध्ये जनावरांचे मांस भरण्यात आले. या सर्व गाडय़ा सकाळी वैजापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याच्या आधारे संतप्त नागरिकांनी देवगाव रंगारी गावाच्या पुढे गारज येथे नदीपुलावर या गाडय़ा अडविल्या व चालकांना खाली ओढून मारहाण करीत पाचही गाडय़ांवर रॉकेल, पेट्रोल-डिझेल टाकून पेटवून दिल्या. प्रकार कळताच आसपासच्या लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसांनीही धाव घेत अग्निशामक दलाच्या गाडय़ांना पाचारण केले. मात्र, या गाडय़ा येईपर्यंत मांस भरलेल्या मालमोटारी जळून कोळसा झाला होता. जमावाचा नूर या वेळी आक्रमक होता. त्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव दलासही बोलविण्यात आले. आगीचे उंच लोट अनेक किलोमीटर दूरवर पाहावयास मिळत होते. जळालेल्या मांसाचा वास व आगीचे रौद्र रूप यामुळे घटनास्थळी जवळ जाताना पोलीस व अग्निशामक दलास मोठी कसरत करावी लागली. मात्र, सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची संध्याकाळपर्यंत पूर्ण माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. त्यामुळे या वेळपर्यंत गुन्हाही नोंदविला गेला नव्हता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा