कास पठारावरील आगीत दुर्मीळ वनसंपदा खाक; महाबळेश्वरलाही फटका

दुर्मीळ फुलांमुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या कास पठाराला लागलेल्या आगीत अनेक दुर्मीळ फुलांचे मळे व वनस्पती मुळासकट जळून खाक झाल्या आहेत. वन विभागाची स्वतंत्र संरक्षण यंत्रणा असताना पठार जळत असल्याचे पाहण्यावाचून पर्यावरणप्रेमींना पर्याय नव्हता. याबाबत पर्यावरणप्रेमी पर्यटक आणि स्थानिकांकडे बोट दाखवत आहेत.

पश्चिम घाटासह जागतिक (वर्ल्ड हेरिटेज साइट) वारसा म्हणून ‘युनेस्को’ने कास पठाराचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळ्यात किमान पाच महिने येथील पठारावर दुर्मीळ फुलांचा हंगाम पाहावयास मिळतो. या वर्षी ओखी वादळाने हवामान बदलाचा परिणाम झाल्याने या वेळी फुलांच्या हंगामावर परिणाम झाला. कास पठार हा डोंगरी भाग असल्याने उन्हाच्या तडाख्याने पठारावरील गवत वाळलेले आहे. थंडीतही पर्यटक मोठय़ा प्रमाणात पठारावर मजा करण्यासाठी येत असतात. अनेकदा झाडाखाली शेकोटी पेटवून पर्यटक बसतात. या पर्यटकांनी पेटविलेल्या शेकोटीच्या आगीच्या ठिणग्यांनी येथील गवताला आग लागली असावी किंवा स्थानिक गुराख्यांकडून पुढच्या वर्षी गवत चांगले यावे. तसेच किडे, मुंगी, जनावरांचे (साप, वन्यप्राणी)यांच्या पासून संरक्षण मिळावे म्हणून गवताला आग लावली असावी असा अंदाज आहे. याबाबत स्थानिक पर्यटकांकडे बोट दाखवत आहेत. कोणीही कोठेही येऊन बसतात. सिगारेट ओढतात, मद्यपान करतात. शेकोटी पेटवतात. कोणाकोणाकडे लक्ष ठेवायचे असा स्थानिकांना पडलेला प्रश्न आहे.

कास पुष्प पठाराबाबत गांभीर्य नसलेल्या मंडळीकडून हे कृत्य घडलेले आहे. वणवा पेटविला जात आहे अथवा सिगारेटच्या जळत्या थोटकांमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी कर्मचारी काहीही बोलायला तयार नाहीत.

कास पठारावर दुर्मीळ अशा साडेआठशेपेक्षा जास्त फुलांच्या वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. याबरोबरच औषधी वनस्पती, कीटक, फुलपाखराच्या बत्तीस प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एकोणीस प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या दहा तर पक्ष्यांच्या तीस प्रजाती आढळून येतात. अशा दुर्मीळ नसíगक ठेवा वनविभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी, स्थानिक प्रयत्नशील आहेत. मात्र काही समाजकंटकांकडून वणवा पेटविण्यात आला आहे. वनविभागाचा संरक्षणासाठी बंदोबस्त आहे. वनसमित्याही परिसराचे संरक्षण करीत असतात. तरीही अशी घटना घडल्याने पर्यावरणप्रेमीतून संताप व्यक्त केला जात आहे.

कास पठारावर फुलांच्या परिसरात वणवा लावण्याची घटना ताजी असतानाच महाबळेश्वरमध्येही बुधवारी वणवा पेटल्याची घटना घडली. शहरापासून जवळच असणाऱ्या लॉडविक पॉइंट येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने सिगारेट पिऊन झुडपांमध्ये टाकली. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या सिगारेटच्या ठिणगीमुळे मोठा वणवा पेटला. या वणव्यामध्ये सुमारे पाच किमी परिसरातील झाडे झुडपे जळून भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक रोहित लोहार, दीपक चोरट यांनी वणवा जास्त भडकू नये यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लॉडविक पॉइंट येथे बुधवारी दिवसभर पर्यटकांची गर्दी होती. या पॉइंटवरून सायंकाळी सूर्यास्ताचे मनोहरी दृश्य पाहायला मिळते. हा सूर्यास्त आपल्या कॅमेरात व मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. याच पॉइंटवर बुधवारी दुपारी पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक धूम्रपान करत होता. धूम्रपान केल्यानंतर या पर्यटकाने सिगारेट पिऊन झाल्यानंतर त्या सिगारेटचे थोटूक  झाडाझुडपात टाकले. संबंधितांना स्थानिकांनी हटकले असता तो पर्यटक निघून गेला. मात्र तो पर्यंत आग भडकलेली होती. आग भडकल्याने मुख्य लॉडविक पॉइंट व परिसरातील तब्बल पाच किलोमीटर परिसरातील झाडे झुडपे जळून भस्मसात झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. सहा वनसंरक्षक व्ही. व्ही. परळकर, वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, वनपाल एस. बी. नाईक घटनास्थळी उपस्थित होते.

लॉडविक पॉइंट येथे तीव्र उतार व दरी आहे. असे असतानाही रोहित लोहार व दीपक चोरट यांनी वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत आग भडकू नये यासाठी प्रयत्न केल्यामुळे आगीने जास्त रौद्र रूप धारण केले नाही. या कार्यामुळे या दोघांचे पर्यटक व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. ज्या पर्यटकाने सिगारेट पिऊन टाकली त्याच्या विरोधात भारतीय वन अधिनियमनुसार आग लावण्याबाबत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी दिली.