चंद्रपूर: कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी (२२ मे) दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली. या आगीत डेपात ठेवण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचे बांबू व निलगिरीचे लाकूड जळून खाक झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान, आग लागण्याचे कारण कळू शकलेले नाही. बांबू डेपोच्या जवळच पेट्रोल पंप असून त्याची झळ त्यापर्यंत पोहचणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बल्लारपूर-आल्लापल्ली महामार्गावर बल्लारपूर पेपरमिलचा बांबू, निलगिरी व सोपबाबूल कच्चा माल साठविण्याचा डेपो आहे. या डेपोतून साठविलेला कच्चा माल बल्लारपूर पेपरमिलला पाठविण्यात येतो. रविवार (२२ मे) कडक उन्हाळ्याच्या दुपारी २ ते ३ च्या सुमारास दरम्यान अचानक आग लागली. पाहतापाहता आगीने रौद्र रूप धारण केले. यात कोट्यावधी रुपयांचा बांबू, निलगिरीचा माल जळाला असल्याचे समजते.
डेपोला आग लागताच बल्लारपूर पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटना स्थळावर दाखल होऊन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हवा जोराची असल्याने आग पसरत गेली आणि संपूर्ण डेपो आगीच्या विळख्यात सापडला. त्यानंतर अधिकच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या राजुरा, चंद्रपूर, गडचांदूर, नारंडा, मूल येथून दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशीर झाला व डेपो जळून खाक झाला.
बल्लारपूर वन परीक्षेत्रातील लावारी कळमना बिटातील जंगलात सकाळपासून वणवा भडकला होता. जंगल जळत जळत डेपोपर्यंत आले असावे. त्याची धग डेपोपर्यंत पोहचली असावी. त्यामुळेच डेपोला आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावर बल्लारपूर पोलीस, पेपरमिलचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
वृत्त देऊपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. बल्लारपू-कोठारी या राष्ट्रीय महामार्गावर डेपो असल्याने व आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या भयंकर भीषण झळाचे लोट उसळत होते. धुरांचे लोट निघत असल्याने संपूर्ण परिसर धुराने झाकला. महामार्गावरील रहदारी थांबविण्यात आली. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार की नाही समजणे कठीण आहे.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड : सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग, नागरिकांमध्ये घबराट
विशेष म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी या बांबू डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावून जाळला होता. त्यानंतर अगदी काही वर्षापूर्वी या बांबू डेपोला अशाच पध्दतीने आग लागली होती. तेव्हाही अशाच प्रकारचे नुकसान झाले होते. या डेपोत वाळला बांबू मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आग भडकल्याचं सांगण्यात येत आहे.