सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ शिराळा येथे फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सुमारे तासाभराने पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा दुर्घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिक तरुणांनी केला.
बार्शी आणि शेजारच्या मराठवाडा भागातील उस्मानाबाद, बीडमध्ये फटाक्यांचे अनेक कारखाने आहेत. मराठवाडा सीमेवर असलेल्या पांगरीपासून जवळच असलेल्या शिराळा गावच्या शिवारात माळरानावर हा फटाक्यांचा कारखाना आहे. रविवारी दुपारी कामगार काम करीत असताना कारखान्यात शोभेच्या दारूचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता, की काही किलोमीटरचा परिसर हादरला. त्यानंतर कारखान्यात एका पाठोपाठ एक असे अनेक स्फोट झाले. त्यांचे आवाज ऐकताच स्थानिक तरुणांनी कारखान्याकडे धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने स्थानिकांना बचावकार्य करणे अवघड बनले. होरपळल्याने बाहेर पळालेल्या जखमी कामगारांना स्थानिक तरुणांनी रुग्णालयात दाखल केले. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा मात्र तासाभराने दुर्घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
विदारक चित्र
या स्फोटानंतर कारखान्यात आगडोंब उसळला. काही कामगार होरपळलेल्या अवस्थेतच जिवाच्या आकांताने बाहेर पळाले आणि मैदानावर येऊन कोसळले. होरपळून शरीर काळे पडलेले हे कामगार असह्य वेदनांनी विव्हळत होते.
अग्निशमन यंत्रणा तासभर उशिरा
स्थानिक तरुणांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणेला दुर्घटनेची माहिती कळविली. परंतु दोन्ही यंत्रणा तासभर उशिरा पोहोचल्या. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी खासगी वाहनांतून जखमी कामगारांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.