सांगली : नशेबाज तरुणांकडून होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
नशेबाज तरुणाबद्दल नगरसेवक मयूर पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग धरून विचारणा करण्यास काही तरुण नगरसेवक पाटील यांच्या एमपी रेसिडन्सी हॉटेलसमोर रात्री जमले होते. यावेळी नगरसेवकांच्या मित्राबरोबर त्यांचा वाद झाला. ही माहिती मिळताच नगरसेवक पाटील हॉटेलजवळ गेले असता त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. तरुणांनी हॉटेलवर तसेच बाहेर उभ्या असलेल्या मोटारीवर दगडफेक केली.
हेही वाचा – “तो आम्हाला…”, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत सुधीर मुनगंटीवारांची टीका
या तरुणांना पांगवण्यासाठी पाटील यांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराशी संबंधित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून नगरसेवकालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले. चौकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.