नांदेड : पूर्ववैमनस्यातून नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील गुरुद्वारा गेट क्र. ६ भागात पेरोलवर सुटलेला गुरमितसिंघ राजसिंघ सेवादार (वय ३५) व त्याचा मित्र रवींद्रसिंघ दयालसिंघ राठोड (वय ३०) हे दोघेजण घराबाहेर थांबले होते. सोमवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार यास आठ गोळ्या लागल्या तर रवींद्रसिंघ राठोड यास दोन गोळ्या लागल्या. गेट क्र. ६ परिसरात वाहन पार्कींगमध्ये थांबलेल्या एका चारचाकी वाहनाच्या काचातूनही एक गोळी आरपार झाली. पोलिसांना येथे रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रवींद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला तर गुरमितसिंघ सेवादार याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे उदय खंडेराय यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रकरणी वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध पथकांची स्थापना केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.