वेगवेगळ्या सरकारी योजना येतात आणि आता तरी परिवर्तन होईल अशी आशा निर्माण करतात. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळीच असते. हीच वस्तुस्थिती ‘आधार कार्ड वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंजना सोनवणे यांच्या सोबतही घडली. कधी काळी सरकारी योजनेमुळे प्रकाशझोतात आलेल्या रंजना सोनवणे या आता नेमक्या काय स्थितीत आहेत, याची साधी दखलही कोणी घेत नाहीये. या ‘आधार कार्ड वुमन’चे नेमके काय झाले याचा हा आढावा…
अधिक वाचा: Video: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…
रंजना सोनवणे हे नाव का प्रसिद्ध आहे?
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात ‘रंजना सोनवणे’ कुठे राहतात हे कोणालाही विचारले तरी सहज त्यांच्या घरी पोहचता येते. ‘आधार कार्ड वुमन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रंजना सोनवणे यांचे गाव नंदुरबार शहरापासून ४३ किमी तर मुंबईपासून ४१६ किमी अंतरावर आहे. १४ वर्षांपूर्वी ‘रंजना सोनवणे’ हे नाव विशेष चर्चेत आले होते. आजही त्या तितक्यात प्रसिद्ध आहेत. २९ सप्टेंबर २०१० रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते आधार कार्ड कार्यक्रमाचा आरंभ झाला होता आणि पहिले कार्ड ‘रंजना सोनवणे’ यांना मिळाले होते. त्यावेळी ३५ वर्षांच्या रंजना सोनवणे यांना देशभरातील पत्रकारांनी अक्षरश: घेराव घातला होता. त्यांची मुलाखत घेण्याचे सत्र सुरु होते, परंतु आता मात्र चित्र वेगळे आहे. ‘द हिंदूं’शी बोलताना रंजना यांनी त्यांची खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘माझ्या संघर्षाबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे?, गेल्या १४ वर्षांमध्ये मी जे पत्रकारांशी बोलले ते सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी वाचले आहे का? (नेमकी काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?)
नेमकी काय परिस्थिती आहे?
रंजना सोनवणे या भिल्ल जमातीतील आहेत. त्यांना रोजच्या जीवनात जगण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतात. त्या म्हणतात, ‘आता मला आधारकार्डाची गरजही लागत नाही. आधार कार्ड आता एका बंद सुटकेसमध्ये आहे’. त्यांच्या गावातील रस्त्यांवर एकेकाळी काही सोलर पॅनल बसवण्यात आले होते. असे असले तरी आजही बहुतांश झोपड्यांमध्ये वीज नाही. रंजना सोनवणे यांनी त्यांच्या शेजाऱ्यांकडून बल्ब लावण्यासाठी १०० रुपये दरमहा वीज कनेक्शन भाड्याने घेतले आहे. शिवाय त्यांच्याच प्रमाणे बहुतांश गावकऱ्यांना शौचालयाचीही सोय नाही.
मुलाचे शिक्षण सुटले!
रंजना सोनवणे यांच्या झोपडीत एक जुने शिलाई मशीन आहे. ‘द हिंदूं’शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘आज मी दोन ब्लाउज शिवले, त्याचे मला १०० रुपये मिळतील. आर्थिक अडचणीमुळे माझ्या १८ वर्षांच्या मुलाने कॉलेजचे शिक्षण सोडले. सकाळीच कामाच्या शोधात तो घराच्या बाहेर पडलाय, माझ्याकडे फक्त २० रुपये होते. मी ते त्याला जेवणासाठी दिले. त्यांचा मोठा मुलगा उमेश सोनवणे (वय वर्ष २२) हा नंदुरबार येथील श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे आणि धाकटा मुलगा (वय वर्ष १५) महाराष्ट्र पोलिसात नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत आहे. ‘द हिंदू’ने म्हटले आहे, रंजना सोनवणे यांच्याशी संवाद साधत असताना त्यांचे पती सदाशिव सोनवणे घरी परतले. त्या दिवशी कोणत्याही प्रकारची कमाई झालेली नव्हती असे त्यांचा चेहरा सांगत होता. घराच्या परिस्थितीचे वर्णन करताना रंजना सोनवणे म्हणाल्या, आमच्या मुलाला आज रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील अशी अशा आहे. सध्या हे संपूर्ण कुटुंब ६०० चौरस फुटाच्या मातीने सारवलेल्या आणि पत्र्याने झाकलेल्या झोपडीत राहत आहेत. गावच्या सुशोभिकरणाच्या वेळेस निळा आणि पांढरा रंग भिंतींना देण्यात आल्याचेही रंजना सोनवणे यांनी म्हटले.
अधिक वाचा: चीनची भूक आफ्रिकन महिलांसाठी का ठरतेय डोकेदुखी?
वीज विभागाने मीटर काढून घेतले
आधार कार्ड सेवा सुरू होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण करून देताना रंजना सोनवणे म्हणाल्या की, ते दिवस उत्सवापूर्वीच्या १५ दिवसांसारखेच होते. यानिमित्ताने अचानक आमच्या गावात काँक्रिटचे रस्ते झाले, झोपड्यांना रंगरंगोटी करण्यात आली, आमच्या घरात इलेक्ट्रिक मीटर बसवण्यात आले आणि आम्हाला सांगण्यात आले की, मासिक बिल १५ रुपये येईल. कार्यक्रमानंतर, पुढील महिन्यापासून वीज बिल ३,००० रुपये आले होते. आम्हाला परवडणे अशक्य होते म्हणून वीज विभागाने मीटर काढून घेतले.
खोटी आशा!
आधार कार्ड सेवा लॉन्च होण्याआधी, रंजना सोनवणे आणि इतर रहिवासी कार्यक्रमासाठी तयार झाले होते. “पाच जणांची टीम मुंबईहून आली आणि त्यांनी आम्हाला आधार कार्डबद्दल प्रशिक्षण दिले असे रंजना म्हणाल्या. त्यांनी आम्हाला सांगितले की, १२ अंकी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांचे चांगले वितरण सुनिश्चित होऊ शकेल असा उद्देश आहे. त्यानंतर आम्हाला जवळच्या कारखान्यात नेण्यात आले जिथे त्यांनी एक छोटीशी चाचणी घेतली. आम्हाला आधार कार्ड आणि त्याचा उद्देश विचारण्यात आला. आम्हाला वाटले आता आमची परिस्थिती बदलेल. माझ्या मुलांना मोठे झाल्यावर मोफत शिक्षण आणि नोकऱ्या मिळतील. परंतु प्रत्यक्षात आमच्या गरिबीतून मीडिया हाऊसेसने रेटिंग मिळवण्याचा हा सर्व खोटा कार्यक्रम आखला होता. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एक बँक खाते तयार केले होते, परंतु त्यात शून्य शिल्लक आहे. जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी बँक खाते उघडले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या खात्यात काही सरकारी योजनेंतर्गत पैसे जमा होतील, परंतु आमच्या बँक खात्यात शून्य शिल्लक आहे. त्यांनी आमच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले, परंतु कोणीही येथे परत आले नाही. मी अनेक सरकारी कार्यालयांना भेटी देऊन माझे आधार कार्ड तसेच सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याबरोबरचे छायाचित्र दाखवले, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठीच्या योजना, शिष्यवृत्ती आणि मला मिळू शकणाऱ्या आर्थिक लाभांबद्दल विचारणा केली आहे पण त्यांनी मला परत पाठवले!
आज, रंजना सोनवणे यांचे शेजारी आणि नातेवाईक त्यांची परिस्थिती पाहून हसतात. “आधार कार्ड मिळवणारी पहिली व्यक्ती असण्यात काय मोठी गोष्ट आहे? अशीही टीका केली जाते. त्या म्हणतात मी याकडे यश म्हणून पाहत नाही. मी लॉटरी जिंकली असेही नाही. इथल्या बहुसंख्य आदिवासी समाजासाठी सत्तेत असलेल्या आदिवासी मंत्र्यांनी काहीही केले नाही, पण ते मत मागण्यासाठी कोणत्याही अपराधी भावनेशिवाय भेटी देतात!