मोहनीराज लहाडे, लोकसत्ता
नगरःराष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गटाचे पहिले शिबिर, नवीन वर्षात ३ व ४ जानेवारीला, श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच होत असलक या शिबिरातून या निवडणुकीच्या रणनीतीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार दोन दिवस पूर्णवेळ या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी ‘ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. शिबिराषाठी आजी-माजी खासदार, आमदार, राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष, विविध सेलचे राज्यप्रमुख, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना ५ वर्षाचा कठोर कारावास
एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वीचे शिबिरही शिर्डीतच झाले होते ते नोव्हेंबर २०२२ मध्ये. ते पक्षाचे प्रबोधन शिबिर होते. स्वतः शरद पवार त्यास उपस्थित होते. मात्र पक्षाचे दुसरे नेते अजित पवार अचानक या शिबिरातून निघून गेल्याने चर्चा झाली होती.
आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचे शिबिरही शिर्डीत होत आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे फुटीपूर्वीचे आणि फुटीनंतरचे लागोपाठ दुसरे शिबिर शिर्डीतच होत आहे. या विलक्षण योगाकडे लक्ष वेधले जात आहे. आगामी शिबिर शिर्डीतील निमगाव-निघोज रस्त्यावरील ‘साईपालखी निवारा’मध्ये होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तसे पत्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदी अन् उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान
शिर्डी हे राज्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असले तरी तेथे मोठ्या संख्येने निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते, हे लक्षात घेऊन शिर्डीमध्ये शिबिर आयोजित केली जातात. शिवाय फुटीपूर्वी नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पक्षाचे ६ आमदार जिल्ह्यात होते. मात्र फुटीनंतर अजितदादा गटाकडे ४ तर शरद पवार गटाकडे २ आमदार राहिले आहेत. जिल्हा पुन्हा ‘शरद पवार यांच्या प्राबल्याखाली आणण्यासाठी या शिबिराचा उपयोग केला जाणार आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेश शिबीरही शिर्डीमध्ये झाले होते. आठवले गटाचे शिबिरही शिर्डीमध्ये झाले होते. शिबिरात सध्याची राजकीय परिस्थिती, शेतकरी-महिला-तरुण -विद्यार्थी-उद्योजकांचे होणारे हाल, सरकारला विसर पडलेली लोकशाही मूल्ये व सध्या संविधानाचे होत असलेल्या अवमूल्यन यासह पक्ष संघटनेचे सक्षमीकरण, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी करावे लागणारे नियोजन, अशा विषयांवर शिबिरात विचारमंथन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.