केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसनं शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील येथे ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे.बेलसर,जेजुरी या परिसरात गेल्या दिड महिन्यापासून डेंग्यू,चिकनगुनीया,मलेरीया आदी साथीच्या आजारांनी थैमान मांडले आहे.त्या अनुषंगाने बेलसर येथील ५१ रुग्णांचे नमुने जमा करुन ते एनाआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.त्यामध्ये प्रामुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आला तर २५ चिकनगुनीया व ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले.त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी बेलसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला शनिवारी  भेट देऊन पाहणी केली व त्वरीत पुढील उपाय-योजना करण्याचे आदेश दिले. केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे.सध्या पुरंदर तालुक्यातून केरळमध्ये डाळिंब मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवले जात आहेत.त्यामुळे तेथे गेलेले व्यापारी किंवा ट्रक चालक यांचेकडून संसर्ग झाल्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे केरळमध्येही झिका व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. “राज्यात आणखी दोन जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ६३ झाली आहे. सध्या राज्यात ३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली.

झिका विषाणूची लागण कशी होते?

एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गर्भातील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजार देखील होण्याची शक्यता असते.

झिका विषाणूची लक्षणं

ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणं दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. असं असलं तरी सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचं सांगणं कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन निदान करणं आवश्यक आहे.

दहा राज्यात करोनाचा प्रकोप!; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

खबरदारीचा उपाय

डास चावण्यापासू संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणं गरजेचं आहे. हा व्हायरस डासांमुळे पसरत असल्याने तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच डबकी किंवा घरात फार दिवस पाणी भरलेलनं राहणार नाही याची काळजी घ्या.

Story img Loader