ओमायक्रॉन वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात असून, दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
१५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण होणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. ओमायक्रॉन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकायदायक नसल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
तसेच, सध्या राज्यात ओमायक्रॉनचे ५४ रुग्ण असून प्रोटोकालनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्र शंभर टक्के लसीकरण होईल असंही टोपे यांनी म्हंटलंय.
ओमायक्रॉनबाबत आम्ही सुरूवातीपासूनच सांगत आलेलो आहोत की, आपण या व्हेरिएंटला खास करून ज्याला भीतीदायक म्हणू असं नाही, मात्र हे नक्की आहे की तो खूप संसर्गजन्य आहे. आतापर्यंत ५४ जण आढळलेले आहेत आणि आपल्या टेस्टिंग देखील जलगतीने सुरू आहेत. आम्ही या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हायरिस्क कंट्रीजमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवशांचे आरटीपीसीआर केले जात आहेत. स्क्रीनिंग केलं जात आहे आणि त्यामध्ये जर ते पॉझिटिव्ह आढळले तर पुढील जिनोमिंग सिक्वेंसिंगसाठी पाठवलं जात आहे.