विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी प्रतिभेचा आविष्कार सर्वानी बघितला आहे. सामान्य रसिकाला नाटककार, चित्रपट कथालेखक आणि पटकथाकार म्हणून ते अधिक परिचित आहेत. त्यांचे ‘कोवळी उन्हे’ हे सदरही अनेकांच्या लक्षात असेल. पण तुलनेने कथालेखक म्हणून त्यांना फार लोकप्रियता मिळाली नाही. प्रस्तुतचे पुस्तक म्हणजे तेंडुलकरांच्या सुरुवातीच्या काळातील कथासंग्रह आहे.. तोही अनुवादित कथांचा! जॉन स्टाईनबेक (आलास पाहुणा), जेम्स थर्बर (साहेबांच्या बाईचा बंदोबस्त), जॅक लंडन (जनावर), माजरेरी कीनन रॉलिंग्ज (त्याची आई), हॉर्टेन्स कॅलिशर (गाठ) अशा पाच कथाकारांच्या या कथा आहेत. प्रत्येक कथेच्या अगोदर मूळ लेखकाचा त्याच्या वैशिष्टय़ांसह व महत्त्वाच्या कलाकृतींसह परिचय दिलेला आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीस ‘तुम्हाला कथालेखक व्हायचं आहे?’ या मथळ्याखाली कथा-तंत्राविषयी तेंडुलकरांनी लिहिले आहे.. ‘‘तुम्हाला चांगले कथाकार व्हायचे असेल तर तुमच्या कथा इतर कुणाच्याही कथांसारख्या नसणे फार महत्त्वाचे आहे. या पाच कथांचे चांगुलपण त्यातल्या प्रत्येकीच्या वेगळेपणात आणि स्वतंत्र घाटातच आहे. चांगल्या कथेला स्वतंत्र घाट हवा, तसाच कथाकाराला त्याचा स्वत:चा स्वतंत्र साचा असणे आवश्यक आहे.’’
प्रस्तुतच्या पाच कथांपैकी माजरेरी रोलिंग्ज यांची कथा १९३६ साली प्रसिद्ध झाली होती. अनाथाश्रमातला एक मुलगा आणि लेखिका यांचे सुरुवातीला अगदी व्यावहारिक, औपचारिक पातळीवर असलेले संबंध पुढच्या काळात अतिशय हृद्य बनतात. तो मुलगा खरोखरच पोरका असतो. पण त्याने लेखिकेला आपली आई हयात आहे, ती चांगली आहे आणि काही कारणांनी आपल्याला तिच्याजवळ ठेवू शकत नाही, असे भासविलेले असते. कथेच्या अखेरीस सत्य उघडकीला येते. आणि पुढे सारे लेखिका तुमच्यावर सोडून देते. तो मुलगा तसे का वागला असेल, याची काहीशी खूण लेखिकेच्या पहिल्या निवेदनात येते- ‘त्याच्यात कर्तेपणा होता. ‘स्वयंभू’पणा नव्हता. त्यात धैर्य, कर्तृत्व अभिप्रेत आहे. पण त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे.’
चांगल्या कलाकृतीचा एक निकष असा की, ती प्रेक्षक/ वाचक यांना सारे समजावून सांगण्याच्या खटाटोपात पडत नाही. ही कथा तशीच आहे. ती वाचताना एकेक अनुभूती देत राहते आणि अखेरीस वाचक दिङ्मूढ होतो.
तेंडुलकरांच्या लेखणीचा प्रथमावतार
प्रस्तुतच्या पाच कथांपैकी माजरेरी रोलिंग्ज यांची कथा १९३६ साली प्रसिद्ध झाली होती.
Written by मुकुंद वझे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-12-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First incarnation of vijay tendulkars text