शरद पवार यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच आयपीएल ही स्पर्धा सुरू झाली. सुरुवातीपासूनच ही स्पर्धा कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरली आहे. त्या वेळी पहिल्या आयपीएलमध्ये मोठा घोटाळा झाला होता. तरी यापूर्वीही याप्रकारचे घोटाळे आयपीएलमध्ये उघडकीस आले असल्याचे आरोप करीत या घोटाळय़ांसंदर्भात कठोर पावले उचलावी लागतील तरच खेळाचा निखळ आनंद लोकांना मिळेल, असे मत लोकसभेचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस आघाडी शासनकर्त्यांना सुबुद्धीसाठी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे काल मुंडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी आज सकाळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कराडच्या प्रीतिसंगमावरील दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार चंद्रकांतदादा पाटील, बाळासाहेब खाडे, नीतिश देशपांडे, नरेंद्र पाटील, श्री पेंढारकर, भरत पाटील, विष्णू पाटसकर, सुवर्णा पाटील, अनुप सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. स्वातंत्र्यानंतर मराठी भाषक राज्याची रचना झाली आणि चव्हाणसाहेबांनी विकासाचा पाया मजबूत केला. त्यामुळे त्यांच्याबद्दल निश्चितच आदर व्यक्त करणे आपले काम आहे. यशवंतरावांनी महाराष्ट्र घडवला. त्यांची घडी आता विस्कटली असून, राज्याची अपेक्षित प्रगती झाली नाही. एकेकाळी पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्र आता पिछाडीवर पडले असून, तामिळनाडू, गुजरात, आंध्र, कर्नाटक ही राज्ये विकासात पुढे जात आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून आपण समाधीवर प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर जनतेचा प्रतिनिधी म्हणून पश्चात्ताप करायला आलो असून, या सरकारला निवडून दिल्याचा जनतेला पश्चत्ताप होतो आहे. ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार, शरद पवार यांच्यावर माफी मागण्याची वेळ आणू नका. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र आहेत. या मानसपुत्राला क्लेश द्यायचा अन् येथे येऊन आत्मक्लेश करायचा हे ढोंग नाही का? अशी टीका मुंडे यांनी केली. आयपीएल बंद व्हावे का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, आयपीएलमधील फिक्सिंग, मॅचमधील गैरप्रकार बंद झाला पाहिजे. परंतु हा खेळच बंद करणे सयुक्तिक होणार नाही. असंख्य चाहते व क्रिकेटप्रेमी आहेत. शरद पवारांनीच आयपीएल निर्माण केले. ते बीसीसीआयचे चेअरमन तर ललित मोदी आयपीएलचे पहिले चेअरमन होते. त्या वेळी पहिल्या आयपीएलमध्ये मोठा घोटाळा झाला होता. तरी यापूर्वीही याप्रकारचे घोटाळे आयपीएलमध्ये उघडकीस आले आहेत. असे आरोप करीत या घोटाळय़ांसंदर्भात कठोर पावले उचलावी लागतील तरच निखळ खेळाचा आनंद लोकांना मिळेल असे मत गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
शरद पवारांनी मी असतो तर घोटाळा होऊ दिला नसता असे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून दिले असता त्यांच्याच काळात आयपीएलचा पहिला घोटाळा झाला होता. पवार आणि घोटाळा हे समीकरण झाले असून, ते कोणी वेगळे करू शकत नसल्याचीही टीका मुंडे यांनी केली. आगामी निवडणुकांसंदर्भात ते म्हणाले, भाजप, शिवसेना व रिपाइं एकत्रित निवडणुका लढवत आहेत. मनसेला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावरच निर्णय असून, त्यांनी ठरविल्याशिवाय काही होणार नाही. असे स्पष्ट करून मात्र, छोटय़ा पक्ष व संघटनांना बरोबर घेऊन आम्ही समर्थपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी मुकाबला करणार आहे.
आरटीआयचे स्वागत-राजकीय पक्षांना आरटीआय अर्थात माहिती अधिकार कायदा लागू करण्यासंदर्भात विचारले असता खासदार मुंडे यांनी प्रथमत: आरटीआयचे स्वागत केले. राजकीय पक्षांना आरटीआय लागू करणे ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार सर्वाधिक भ्रष्ट असून, भ्रष्टाचार लपविण्यासाठी त्यांच्याकडून आरटीआयला विरोध होत आहे. राजकीय पक्षांना आरटीआय लागू करण्यास भाजपचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस हा घोटाळेबहाद्दराचा पक्ष असल्याने त्यांचा माहिती अधिकार कक्षात येण्यास विरोध असावा. मनमोहन सिंग सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहे. कॉमन वेल्थ, टेलिकम्युनिकेशन आणि कोलगेट ही त्यांची भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे आहेत. आरटीआयमुळे पक्षात पारदर्शीपणा आल्यास कारभार सुधारायला मदतच होईल असे मला वाटते. मी याचे स्वागत करतो.
उदयनराजेंचा कोंडमारा-खासदार उदयनराजे भोसले हे माझे मित्र आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडमारा होत आहे. त्यांना अपमानास्पद वागणूक देणारे येथे येऊन आत्मक्लेश करीत आहेत. सातारा जिल्ह्याकडे आमचे दुर्लक्ष झाले हे खरे असलेतरी पुन्हा जोमाने येथे काम करू असे मुंडे यांनी सांगितले.
शरद पवारांच्या काळातच ‘आयपीएल’चा पहिला घोटाळा- मुंडे
शरद पवार यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच आयपीएल ही स्पर्धा सुरू झाली. सुरुवातीपासूनच ही स्पर्धा कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरली आहे. त्या वेळी पहिल्या आयपीएलमध्ये मोठा घोटाळा झाला होता.
आणखी वाचा
First published on: 06-06-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First ipl scam in the days of sharad pawar munde