सोलापूर : आज रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा होत असताना मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा पुरावा मानता येईल, अशा हजार वर्षांपूर्वीचा पहिला मराठी शिलालेख आजही दुर्लक्षित स्वरूपात आहे. सोलापूरजवळील हत्तर कुडल संगम येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात अस्तित्वात असलेला हा मराठीतील पहिला शिलालेख शासकीय स्तरावर बेदखलच ठरला आहे. दुसरीकडे काही राजकारणी मंडळींनी या शिलालेखाच्या सहस्त्राब्दी वर्ष शासनाकडून साजरा करण्याच्या नुसत्या बाता मारून स्वतःच्या नावाच्या डंका पिटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

सोलापूर-विजापूर मार्गावर सोलापूरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे भीमा व सीना नदीच्या संगमावर संगमेश्वर आणि श्री हरिहरेश्वर ही दोन प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत. यापैकी श्री संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या घडीव तुळईवर इसवी सन १०१८ साली (शके ९४०) कोरलेला मराठी शिलालेख आहे. या शिलालेखाचा शोध सोलापूरचे दिवंगत अभ्यासक आनंद कुंभार यांनी लावला आहे. मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीच्या १८२ वर्षे अगोदरचा जुना असा हा शिलालेख आहे. संशोधक आनंद कुंभार यांनी यासंदर्भात दिलेल्या पुराव्याला पुण्याचे ज्येष्ठ इताहास संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे आणि वि. ल. भावे यांनीही पुष्टी देताना हा मराठी शिलालेख सर्वात पुरातन असल्याचा निर्वाळा दिला आहे. या शिलालेखाची लांबी ९४ सेंमी तर रूंदी १६ सेंमी आहे. त्यावरील अक्षरांची उंची सुमारे एक सेंमी आहे. या शिलालेखाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात संस्कृत आणि मराठी भाषेचा संगम झाला आहे. शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत. पहिली ओळ ‘ ॐ स्वस्ति श्री सकु ९४० काळयुक्त संवत्सर माघ सु कधानुळी काळछळा ‘ आहे. तर दुसरी ओळ ‘ पंडित गछतो आयाता मछ..मि छिगळ नि १००० ‘ अशी आहे. तिसरी ओळ ‘ वाछि तो विजेयां होऐवा || याप्रमाणे शुध्द मराठी भाषेत लिहिली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मराठी भाषा केव्हापासून बोलू जाऊ लागली, याचा काळ जरी सिध्द करता आला नाही तरी ती केव्हापासून अक्षरबध्द झाली हे अशिलालेखावरून सांगता येते. शिलालेखांचा अभ्यास करताना कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वर-बाहुबलीच्या चरणांपाशी ‘ चामुण्डराये करवियले | गंगाराये सुत्ताले करवियले| असा मजकूर असलेला पहिला मराठी शिलालेख मानला जात होता. परंतु पुढील काळात नव्या संशोधनात रायगड जिल्ह्यातील आक्षी येथील इसवी सन १०१२ (शके ९३४) मधील शिलालेख सापडला. त्यामुळे हा शिलालेख मराठी भाषेतील पहिला शिलालेख म्हणून समोर आला. तथापि, या शिलालेखातही काळाचे वाचन चुकीचे झाले असून त्याचे खरे वाचन शके ११३२ असे आहे, ही बाब काही संशोधकांनी पुढे आणली. दिवे आगर (रत्नागिरी) येथील ताम्रपट शके ९७१ (इसवी सन १०४९) मधील आहे. परंतु हा ताम्रपटही मराठी भाषेतील पहिला लिखित पुरावा ठरला गेला नाही. कारण सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील नव्याने सापडलेल्या मराठी भाषेतील शिलालेखाचा काळ इसवी सन १०१८ (शके ९४०) निश्चित आहे. मराठी भाषेतील स्पष्ट कालोलिखित असलेला हा शिलालेख आजही सुरक्षित आहे.

कोण्या एका काळामुख यतीला एक सहत्र निवर्तन भूमी वा निष्क (तत्कालीन चलन) देणगी म्हणून दिलेली आहे, अशा आशयाचा अर्थ असलेल्या या मराठीतील शिलालेखाला २०१९ साली एक हजार वर्षे पूर्ण झाली आहेत. मराठीतील या पहिल्या आणि आद्य शिलालेखाची सहस्त्राब्दी शासकीय पातळीवर साजरी करण्याची घोषणा याच दक्षिण सोलापूरचे आमदार तथा तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. त्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत झाली होती. यानिमित्ताने मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील या महत्वाच्या ठेव्याची उपेक्षा न होता त्याचे चांगल्या प्रकारे  संवर्धन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात या शिलालेखाची सहस्राब्दी वर्ष शासनाच्या स्तरावर झालीच नाही. आजही हा ठेवा मोलाचा असूनही दुर्लक्षितच आहे.

Story img Loader