सर्वच क्षेत्रात पीएच. डी. चे महत्त्व वाढत असताना मराठी भाषा विषयातील प्रबंधांचे अमृत महोत्सवी वर्ष दुर्लक्षित राहिले असून राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग वा महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातच मराठी भाषेची घोर उपेक्षा होत आहे.
मराठी विषयासाठी ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ ही पदवी देण्याची सुरुवात मुंबई विद्यापीठाने केली होती. डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचा प्रबंध मुंबई विद्यापीठाने २९ जून १९३८ या दिवशी स्वीकारून मराठीतील पहिली पीएच. डी. त्यांना बहाल केली. शनिवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
मराठी भाषेच्या प्रबंध निर्मितीच्या रौप्य महोत्सवी (१९६४) आणि सुवर्ण महोत्सवी वर्षांत (१९८९) मराठी प्रबंधांच्या सूचीची पहिली आवृत्ती तसेच ७० वर्षांतील प्रबंधांची (२००७ पर्यंत) दुसरी आवृत्ती नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केली आहे. नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. वसंत विष्णु कुळकर्णी वयाच्या ८५ व्या वर्षी सूची संकलनाचे काम अव्याहतपणे करीत आहेत. डॉ. कुळकर्णी यांच्याकडे महाराष्ट्रातील विद्यापीठांनी गेल्या ७० वर्षांत स्वीकारलेल्या एकूण १७०० प्रबंधांची यादी आहे. परंतु, २०१२ पासूनच्या प्रबंधांच्या यादीसाठी वारंवार आवाहन करूनही विद्यापीठांकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सूची संकलनाचे कार्य पूर्ण होऊ न शकल्याची खंत डॉ़ कुळकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केली.
मराठी भाषेत पीएच. डी. साठी डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांनी सर्वप्रथम २४ ऑक्टोबर १९३८ रोजी तत्कालीन नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. परंतु, डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी मुंबई विद्यापीठात सादर केलेला प्रबंध आधी स्वीकृत झाल्याने ते मराठी भाषेत पीएच. डी. मिळविणारे पहिले मानकरी ठरले. डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या प्रबंधाचा विषय ‘स्वभावलेखन’ हा होता. तर महिलांमध्ये नागपूर विद्यापीठाने डॉ. तारा गंगाधर केळकर यांना २७ जानेवारी १९४९ रोजी पीएच. डी. प्रदान केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘स्त्री जीवन – काळ महानुभाव ते रामदास’ असा होता.
ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
पुणे विद्यापीठातील माजी मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. अविनाश आवलगावकर यांनी मराठी प्रबंधांच्या सूचीचे महत्त्व वादातीत असल्याचे विधान केले आहे. अनेक होतकरू संशोधकांना यामुळे नव्या वाटा गवसणार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. मराठी वाङ्मय इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दत्तात्रेय पुंड यांनीही मराठीच्या अभ्यासकांसाठी प्रबंध सूचीचे संकलन भविष्यात मोलाचे ठरेल, याची कल्पना विद्यापीठांना दिली होती़ मात्र या सूचनांकडे विद्यापीठांनी सपशेल दुर्लक्ष केले आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा