शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. शिवाय, ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यासर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूस शिवसेनेकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीसंदर्भात मंत्री व प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर (शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण देण्याचा आदेश) आज संध्याकाळी शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीत काही नवीन पदाधिकारी निवडले/नियुक्त केले जाऊ शकतात, असेही दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उद्धव ठाकरे गटावर चहूबाजूंनी हल्ला करण्याची रणनीती आखल्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
शिंदे गटाने ‘शिवसेना भवन’ची मालकी असलेल्या ‘शिवाई ट्रस्ट’च्या विरोधात सोमवारी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली, तर दुसऱ्या बाजूला विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयही ताब्यात घेतले. त्याचबरोबर पुढील आठवडय़ात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी ठाकरे गटाच्या आमदारांनाही पक्षादेश बजावण्यात येईल, असेही जाहीर केले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच शिंदे गटावरही हल्ला चढवला. आयोगाचा निर्णय अमान्य असून तो देणारा आयोग बरखास्त करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारपासून सलग तीन दिवस सुनावणी सुरू होणार आहे.