वाघांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी देशातील पहिला रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग पुढील वर्षीपासून महाराष्ट्राच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात राबविला जाणार आहे. ताडोबा आणि आसपासच्या परिसरातील वाघांना रेडिओ कॉलर बसविला जाणार असून त्या आधारे वाघांच्या हालचालींचा अभ्यास करणे शक्य होईल. या प्रकल्पासाठी १ कोटी ७० लाख रुपये खर्च येणार असून हा प्रकल्प दीर्घकालीन आणि र्सवकष राहील, याची पूर्वखबरदारी घेतली जाणार आहे. पाच वर्षांसाठी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.  पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चदरम्यान याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.  
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ६२५ चौरस किमी असून बफर झोन ११०२ चौरस किमी पर्यंत पसरलेले आहे. रेडिओ कॉलरिंगच्या माध्यमातून वाघांच्या हालचालींवर देखरेख करताना नागभीड, भिवापूर, उमरेड पर्यंतच्या जंगलात जाणाऱ्या वाघांच्या हालचालींचा मागोवा घेता येईल. तसेच वाघांची संख्या, प्रजनन, भक्ष्यांची संख्या आणि कॉरिडॉर्स यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. ताडोबातील वाघांच्या बछडय़ांचेही रेडिओ कॉलरिंग केले जाणार आहे. व्याघ्रगणनेचा प्रयोग वगळता भारतात वाघांचे रेडिओ कॉलरिंग अद्याप कोणत्याही व्याघ्र प्रकल्पात सुरू झालेले नाही. ज्येष्ठ वन्यजीव तज्ज्ञ के. उल्हास कारंथ यांनी १९९०-९६ दरम्यान रेडिओ कॉलरिंगच्या प्रयोगाचा विशेष अभ्यास करून तसा अहवाल सादर केला आहे. ताडोबातील रेडिओ ‘कॉलरिंग’साठी ‘वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या वैज्ञानिक आणि तज्ज्ञांशी विचारविमर्श केला जात असून डॉ. बिलाल हबीब प्रकल्पाची सूत्रे हाताळणार असल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी दिली. मूळ जागेवरून भरकटलेले वाघ नेमके किती किलोमीटपर्यंत प्रवास करतात, त्यांचे प्रजनन कसे होते आणि आपले भक्ष्य ते कसे मिळवितात या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प अमलात आणला जात आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात नागपूरपासून ६० किमी अंतरावरील एका कालव्यात पडलेल्या वाघिणीची सुटका करून तिला रेडिओ कॉलरिंग बसविण्यात आले होते. यानंतर तिला जंगलात मुक्त करण्यात आले. महिनाभरात ती पुन्हा ताडोबाच्या जंगलात आढळली. यावरून रेडिओ कॉलरिंगच्या प्रयोगावर वन खात्याने गंभीरपणे विचारविमर्श सुरू केला. आता हा प्रयोग प्रत्यक्षात राबविला जाणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा