मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ३६६ किमी अंतरावरील जमीन भूसंपादन व रस्ते बांधकामास पाच हजार कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नॅशनल हायवे व सागरी महामार्गाच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. छगन भुजबळ यांनी आरोंदा येथे जाहीर केले. तसेच देशातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गात होणार असून अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या आरोंदा किरणपाणी या पुलाचे उद्घाटन व तळवणे वेळवेवाडी या पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ना. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, गोवा आरोग्यमंत्री ना. लक्ष्मीकांत पार्सेकर, जि. प. अध्यक्षा निकिता परब, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, माजी आमदार शंकर कांबळी, पुष्पसेन सावंत, सुरेश पारकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, बाळा भिसे आदी उपस्थित होते.
सागरी महामार्ग ४०० किमी अंतराचा आहे. त्यातील ३९५ किमीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील ३३ मोठय़ा पुलांपैकी २९ पूर्ण तर दोन मोठे पूल प्रगतिपथावर व दोन मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सागरी मार्गावरील मोठय़ा खाडय़ांमुळे पुलांचा खर्च मोठा आहे व जमीन संपादन अडथळे येत आहेत. पण सागरी महामार्ग लवकर व्हावा म्हणून सरकार सकारात्मक आहे, असे भुजबळ म्हणाले.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी हा २२ किमी अंतराचा चौपदरी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. आता इंदापूर ते कशेडी, संगमेश्वर ते राजापूर व राजापूर ते झाराप असा ३६६ किमीचा रस्ता बांधणी व भूसंपादनाचा प्रस्ताव आहे. भूसंपादनास एक हजार कोटींपेक्षा जास्त, तर रस्ते बांधकामास चार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असून प्रस्ताव तयार आहेत, असे भुजबळ म्हणाले.
भारतातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्ग चिपी विमानतळापासून १५ किमी अंतरावर होऊ घातला आहे. त्यासाठी एक हजार हेक्टर जमीन संमतीपत्रे घेण्यात आली असून या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी केली आहे, असेही भुजबळ म्हणाले.
या सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी केंद्र सरकार २०० कोटी देईल आणि राज्य सरकार व खासगी गुंतवणुकीतून प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे आणखी तीन ते चार हजार कोटींचा अन्य विकास होईल. त्यासाठी अहवाल बनविण्यात आले आहेत. सी-वर्ल्ड प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून तांत्रिक किचकट आहे, असे भुजबळ म्हणाले.
पर्यटन उद्योगात गोवा व केरळ आघाडी घेत आहे, हे महाराष्ट्र सरकारच्या लक्षात येताच आता राज्यात पर्यटन उद्योगाअंतर्गत आघाडी घेऊन गुंतवणूक केली जात आहे. समुद्रकिनारपट्टीसह राज्याचा पर्यटन विकास साधला जाणार आहे. डेक्कन ओडिसी पुन्हा धावावी, तसेच तारकर्ली बीच, गणपतीपुळे व हरिहरेश्वरसारख्या ठिकाणांचा विकास साधला जात आहे. तारकर्लीत पहिले स्कुबा डायव्हिंग सेंटर येत्या दोन-तीन महिन्यात सुरू होत आहे, असे भुजबळ म्हणाले. या वेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिलीप भावे, कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्गात देशातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प होणार – भुजबळ
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ३६६ किमी अंतरावरील जमीन भूसंपादन व रस्ते बांधकामास पाच हजार कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नॅशनल हायवे व सागरी महामार्गाच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. छगन भुजबळ यांनी आरोंदा येथे जाहीर केले.
आणखी वाचा
First published on: 18-03-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First sea world project to be build at sindhudurg chhagan bhujbal