श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीजवळील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो. पण रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथील एक शिलालेख याहूनही पुरातन असल्याचे उघडकीस आले आहे. निर्मितीच्या हजार वर्षांनंतरही हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे.
श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठीत कोरलेला शिलालेख आहे. श्रीचामुंडाराये करवियले गंगाराये सुत्ताले करवियेले हा प्राचीन भारतातील सर्वात जुना मराठी शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र रायगड जिल्ह्य़ातील आक्षी गावात याहूनही जुना मराठीतील एक शिलालेख आढळून आला आहे. श्रवणबेळगोळ येथील शिलालेखाची निर्मिती इसवि सन १११६-१७ मध्ये करण्यात आली. तर आक्षी येथील शिलालेखावर निर्मिती इसवि सन १०१७ अर्थात ९३४ मध्ये करण्यात आली. त्यामुळे आक्षी येथील हा शिलालेख हा प्राचीन भारतातील पहिला ज्ञात शिलालेख असल्याचा दुजोरा इतिहास संशोधकांनी दिला आहे.
या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. पश्चिमसमुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराय यांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला आहे. महालक्ष्मी देवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचे उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.
मराठीतील या आद्य शिलालेखाच्या निर्मितीला आज हजार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र इतिहासाच्या या अमूल्य ठेव्याच्या नशिबी मात्र प्रतारणाच आली आहे. आक्षीतील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धूळ खात पडला आहे. पुरातत्त्व विभागालाही याची जाणीव झालेली नाही. आक्षीत येणाऱ्या पर्यटकांनाही या शिलालेखाचे महत्त्व कळून येत नाही त्यामुळे रस्त्याच्या कडेला एका चौथऱ्यावर हा शिलालेख पडून आहे. आज मराठीचे कैवारी म्हणवणारी राजकीय नेते मंडळी या शिलालेखाच्या संवर्धनासाठी समोर येणार का, असा सवाल विचारला जातो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा