महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाच्या घरट्यातून ७४ पिल्ले बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार व सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.

देवबाग – तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवाने अंडी घालून घरटे बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर ११ जानेवारी रोजी समोर आणली होती. सुरुवातीला हे घरटे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीची असल्याचे बोलले जात होते. परंतु या कासवाचे फोटो आणि व्हिडिओ येथील पर्यावरण विषयक अभ्यासक संदीप बोडवे यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले होते. या फोटो आणि व्हिडिओ मधील कासव हे ‘ऑलिव्ह रिडले’ या सागरी कासव प्रजाती पेक्षा काहीसे वेगळे वाटत असल्याचे कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी या बाबत चर्चा केली.  सखोल माहिती साठी फोटो आणि व्हिडिओ बेंगलोर येथील वाईल्ड लाईफ  कॉन्झव्हेशन सोसायटीचे कासव अभ्यासक नुपूर काळे यांनाही पाठविण्यात आले. काळे यांनी या फोटो आणि  व्हिडिओंचा अभ्यास केल्या नंतर हे कासव ग्रीन सी टर्टल असल्याचे स्पष्ट केले.

ग्रीन सी टर्टलने अंडी घालून घरटे बनविल्यानंतर ५२ दिवसांनी घरट्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. सकाळी कासवाची पिल्ले घरट्यामधून बाहेर येतील, याचा घरट्याचे रक्षक पंकज मालंडकर यांना अंदाज असल्यामुळे ते पहाटे पासूनच घरट्याजवळ पहारा देत होते.  घरट्यामधून ७४ पिल्ले बाहेर आली.

महाराष्ट्रात पहिल्या ग्रीन सी टर्टल घरट्याची नोंद देवबाग तारकर्लीच्या किनाऱ्यावर होणे व अंड्यातून पिल्ले बाहेत येणे ही येथील कासव संवर्धन करणाऱ्या निसर्ग मित्रांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मागील ५२ दिवस हे घरटे व त्यातील अंड्यांचे संरक्षण करणे अतिशय महत्त्वपूर्ण होते. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासव प्रजातीची भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येते घरटी आढळून येतात. या कासवाच्या खालील कवचाच्या बाजूला ग्रीन रंगाचे फॅट असते. म्हणून याला ग्रीन सी टर्टल असे संबोधले जाते.  महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, हॉक्स बिल, लॉगर हेड आणि  लेदर बॅक अशा पाच प्रजातीं आढळून येतात. त्या पैकी ऑलिव्ह रिडले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अंडी घालून घरटी बनवितात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळून येणाऱ्या का ग्रीन सी टर्टल आणि लेदर बॅक ही आकाराने मोठी असणारी कासवे आहेत. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाला अंडी देण्यासाठी पूर्ण वाढ होण्यास २० ते ३० वर्षांचा कालावधी लागतो, अशी माहिती कासव मित्र पंकज मालंडकर यांनी दिली.