रत्नागिरी – कोकणातील पहिली वारकरी शाळा खेड तालुक्यातील काडवली गावात उभारण्यात येणार आहे. वारकरी परंपरेचा गाढा वारसा आणि इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबरच आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही वारकरी शाळा उभारली जाणार आहे. श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे (आंबडस) यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा २४ गुंठे जागेवर उभी करण्यात येणार आहे.

या निवासी वारकरी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देवून त्यांना संस्कारक्षम, सुसंस्कृत आणि सजग नागरिक बनवण्याचा ऊद्देश संस्थेचा आहे. बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माचे बीज रोवण्याची गरज ओळखून ही शाळा उभारली जाणार आहे. संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देऊन त्यांना आत्मभान आणि पालकांची योग्य ती जाणीव करुन देणे, हा संस्थेचा मुख्य हेतू आहे.

श्री गुरुमाऊली संस्थेने यासाठी काडवली येथे विद्यार्थ्यांना पारंपारिक आणि आध्यात्मिक शिक्षणाचा संगम साधत मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे. शारिरीक व बौद्धिक प्रगतीसह अध्यात्मिक उन्नयन घडवण्याचे हे केंद्र ठरणार आहे. ही शाळा जनतेच्या सहकार्याने उभी करण्यात येणार असल्याने दानशूर व्यक्तींनी उदारहस्ते मदत करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकणातील तरुणाईला आध्यात्मिक आणि संगीत शिक्षणाबरोबर वारकरी सांप्रदायाचे सखोल ज्ञान मिळावे, विकृतींचा प्रभाव दूर ठेवून त्यांच्यात परमार्थाचे बोधप्रद विचार रुजावेत, याच हेतूने काडवली येथे ही वारकरी शिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

राकेश मोरे, कीर्तनकार