औद्योगिक क्षेत्रातील विनाप्रक्रिया रासायनिक सांडपाणी थेट समुद्रात

तारापूर औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे किनाऱ्यावर मृत मासे पाहावयास मिळत आहेत. औद्योगिक क्षेत्रापासून काही अंतरावर असलेल्या दांडी नवापूर खाडीसह समुद्रकिनारी अनेक दिवसांपासून मृत मासे पाहावयास मिळत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.

पालघर तालुक्यातील दांडी नवापूर खाडीत दहा वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात येथील लहान मच्छीमार मासेमारी करीत असत. याच खाडीवर अनेक मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालत असे. सध्या खाडीत माशांचे प्रमाण कमी होत चालले आहे. जे काही मासे हाती लागतात त्यांनाही रासायनिक वास येत असल्याने ते खाण्यास योग्य नाहीत. एकीकडे खाडीत मेलेल्या माशांचे प्रमाण वाढले असतानाच अरबी समुद्रकिनारपट्टीच्या दांडी भागात मोठय़ा प्रमाणात किनाऱ्यावर मृत मासे दिसून येत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे शेतजमिनी प्रदूषण करणाऱ्या तारापूर औद्योगिक क्षेत्राने आता समुद्रही प्रदूषित केल्याने शेतकऱ्यांसह मच्छीमारही मोठय़ा प्रमाणात संकटात येण्याची शक्यता आहे. या साऱ्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करीत नसल्याचा आरोप कोळीबांधवांनी केला आहे.

अरबी समुद्रात औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्याचे प्रदूषण वाढल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषद राष्ट्रीय हरित लवाद पुणे येथे याचिका दाखल केली होती. परंतु औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांवर प्रदूषणाबाबत र्निबध घालण्याबाबत हरित लवादाचे आदेशाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या काही महिन्याअगोदर पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेबरोबर सभा झाली होती. यावेळी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली होती. तसेच लगेच दुसऱ्या दिवशी अपर जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कारखान्यांचा ४० टक्के पाणीपुरवठा बंद करणे, रात्रीच्या वेळी गस्ती वाढवणे व नवीन कारखान्यांना परवानगी देण्यात येऊ नये याबाबत चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन नेहमीप्रमाणे मच्छीमारांना देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही आश्वासनावर बोळवण करीत असल्याचे आरोप मच्छीमार करीत आहेत.

रोज २० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया

तारापूर औद्योगिक क्षेत्रात सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता २५ एमएलडी इतकी असतानाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कारखान्यांना ४२ एमएलडी पाण्याचा पुरवठा करते. यामुळे रोजच सुमारे २० एमएलडी रासायनिक घातक सांडपाणी प्रक्रिया करताच समुद्रात सोडले जात असल्याचे दिसून येते. कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करून ते समुद्रात सात किलोमीटर लांब सोडण्याचे निर्देश राष्ट्रीय समुद्र संशोधन विभागाने प्रशासनाला दिले होते. समुद्रात सात किलोमीटपर्यंत वाहिनी टाकण्याचे काम प्रलंबित असल्याने व त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सध्या १०० ते २०० मीटर अंतरावरच रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे खाडी भागातील व किनारपट्टी भागातील मासेमारी संकटात आली आहे.

यापूर्वी फक्त सांडपाण्याची जास्तीत जास्त मात्रा शेती शिवार खाडी खाजणात दिसून येत होती, परंतु आता त्याचा परिणाम  समुद्रकिनारी होत आहे आणि समुद्रातले मासे सुद्धा किनाऱ्यावर मरून पडत आहेत. -कुंदन दवणे, कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय मांगेला समाज परिषद

Story img Loader