कृष्णा नदीमध्ये दुषित पाण्यामुळे कोल्हापूर मार्गावरील अंकली येथे हजारो मासे मृत्यूमुखी पडले असून मृत मासे गोळा करण्यासाठी शुक्रवारी नागरिकांची झुंबड उडाली होती. कोल्हापूर मार्गावर सांगली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीचे पात्र आहे. हरिपूर येथे वारणा नदीचा संगम झाल्यानंतर हे ठिकाण असून आज सकाळी नदीकाठाला मृत मासे येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पडला होता. मृत माशे झुंडीने काठाला येत असल्याचे दिसून आले. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
हेही वाचा >>> “महाराष्ट्र सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा…” छगन भुजबळ सरकारविरोधात आक्रमक
कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडले जात असल्यामुळे आणि नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे नदीतील जलचर संकटात आले आहे. नदीतील पाणी प्रदुषित झाल्याने मासे मृत होत असल्याचे सांगितले जात आहे.
मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीच्या कृष्णा नदी येथे नागरिकांची झुंबड उडाली आहे, लहान माशापासून आठ-दहा किलो वजनाचे मासे देखील या ठिकाणी आता मृत झाल्याचे आढळून आले. मोठे मासे आढळल्याने खव्वयांनी मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, सांगलीतील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की नदी प्रदुषित होण्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. अंकली पूलाजवळील व सांगलीमध्ये शेरी नाला ज्या ठिकाणी नदीला मिळतो त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून पाणी प्रदुषण होण्यामागील निश्चित कारण येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, अंकली पूलाजवळ काही मृत माशेही मत्स्यविकास मंडळाच्या अधिकार्याकडून ताब्यात घेण्यात आले असून मासे मृत होण्यामागील कारण या तपासणीतून स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.