दापोली किनारपट्टीवर उत्तरेकडील जोरदार वाऱ्याचा वेगामुळे मासेमारीला ब्रेक लागल्यामुळे किमान ८०% नौका नांगर टाकून उभ्या आहेत. त्यामुळे हर्णे बंदरात मासळीच नाही. त्यामुळे गेले महिनाभर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती मध्ये दुष्काळात तेरावा प्रमाणे मच्छिमारांची अवस्था झाली असून हर्णे बंदराची आर्थिक घडीच विस्कटलेली दिसत आहे. या परिस्थितीमुळे मोठा परिणाम येथील उद्योग विश्वावर झालेला दिसत आहे. रोज होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
गेले ४ ते ५ दिवसांपासून अचानक किनारपट्टीला उत्तरेकडील जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गेली चार ते पाच दिवस थंडीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. शनिवार १ जानेवारी रोजी किमान तापमान ९.४ आले होते. तेंव्हापासून दापोलीमध्ये थंडीचे प्रमाण देखील चांगलेच वाढले आहे. गेल्या साधारण महिन्याभरात वातावरणात उन्हाळा सुरू झाला होता तेंव्हा नागरिकांना चांगलेच उन्हाचे चटके बसायला लागले होते. परंतू गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी पासूनच किनारपट्टीला सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे थंडीचे प्रमाण खूपच वाढले आहे.
उत्तरेकडील वाऱ्यामुळे खोल समुद्रात पाण्यामध्ये मासेमारी करणे शक्य होत नाही. यामुळे मासेमारी करीत टाकलेली जाळी देखील गुरफटली आहेत आणि आता ते मच्छीमारांना सोडवायला लागत आहेत. यामध्ये जाळ्यांचे नुकसान खूप होते. म्हणूनच अशा जोरदार वाऱ्यामुळे मच्छीमार समुद्रात मासेमारीला जात नाहीत. त्यामुळे हर्णे बंदरात किमान १५० नौका , आंजर्ले खाडीत ४५० नौका तर उर्वरित २५% नौका आपल्या जबाबदारीवर मासेमारीला गेले आहेत. परंतु वारा कमी होत नसल्याने गेलेल्या नौका देखील मासळीविना परत सुद्धा येऊ शकतात. गेले महिनाभर फक्त टायनी कोळंबीवर बंदर तग धरून होते. मात्र आता उत्तरेच्या वाऱ्यामुळे बोटीच किनाऱ्यावर आणाव्या लागल्यामुळे उलाढाल थंडावली आहे ; असे येथील मच्छीमारांनी सांगितले.
“हंगाम सुरू झाल्यापासून तशी मासळीची आवकच घटली आहे आणि त्यात असे प्रसंग आले की मच्छीमारांनी काय करायचं? नोकरांचा पगार अंगावरच पडतो. जोपर्यंत हा वारा थांबत नाही तोपर्यंत खोल समुद्रात मासेमारीला जाऊ शकत नाही,” असे येथील मच्छीमार अनंत नागु चोगले यांनी सांगितले.