मासे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक वादातून दोन तरुणांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांग मच्छीमाराचा मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे हा प्रकार घडला असून उमेश अनंता भोसले (वय ३५) असे या मृत  मच्छीमाराचे नाव आहे.

उमेश भोसले हे उजनी जलाशयात चिखलठाण परिसरात कुटुंबीयांसह मासेमारीचा व्यवसाय करत होते. मासे पकडण्यासह जाळे आणि मासे विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. उमेश हे दिव्यांग होते. मासेमारीवरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे.

रात्री उशिरा सचिन किसन गोळे व पप्पू अशोक जानभरे हे दोघे तरुण उमेश भोसले यांच्या घरी गेले. त्यांनी भोसले यांच्याकडे मासे मागितले असता भोसलेंनी मासे शिल्लक नसल्याचे सांगितले. नकारामुळे संतापलेल्या गोळे आणि जानभरे या दोघांनीही त्यास बेदम मारहाण केली. उमेश भोसले स्वत: वापरत असलेली कुबडी घेऊन त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पोटावर, दोन्ही हाता-पायांवर बेदम मारहाण केली. यात उमेश हे गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी सुनीता ही वाचवण्यासाठी धावून आली असता त्यांनादेखील मारहाण झाली. उमेशच्या बहिणीवरही हल्ला करण्यात आला. बेशुद्धावस्थेत असलेल्या उमेश यांना रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader