आरोंदा किरणपाणी येथील कांदळवनाची पाहाणी आज करण्यात आली. या ठिकाणी असणाऱ्या कांदळवनाची सविस्तर माहिती शासनाकडे ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून आरोंदा मच्छीमारांनी कांदळवन बचाव लढा सुरू केला. विधान परिषदेतील तत्कालीन आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रस्तावाच्या आश्वासनाची आज पाहाणी करण्यात आली.ठाणे येथील कांदळवन मुख्य वनसंरक्षक वासुदेवन, वनखात्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. मुजुमदार, उपवन संरक्षक तुकाराम साळुंखे, वनक्षेत्रपाल कुलकर्णी व भूमी अभिलेखाचे अधिकारी उपस्थित होते.
आरोंदा किरणपाणी येथे २९.३५ हेक्टर कांदळवन क्षेत्र वनखात्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याशिवाय सुमारे ४०० एकर खासगी क्षेत्रात कांदळवन आहे. या क्षेत्रापैकी सुमारे १०७ एकर कांदळवन क्षेत्राची जमीन खरेदी करून तेथे पर्यटन आधारित प्रकल्पाला बिनशेती परवानगी शासनाने दिली होती. या कांदळवन क्षेत्रात बिनशेती देण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर मच्छीमारांनी आवाज उठविला, पण त्याला वन व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी दाद दिली नव्हती. त्यामुळे शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांनी विधान परिषदेत आवाज उठविला होता.
माजी आमदार उपकरकर यांना विधान परिषदेत मिळालेल्या आश्वासनाच्या पाश्र्वभूमीवर कांदळवन व वन खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कांदळवन क्षेत्राची पाहणी केली. या वेळी मच्छीमारांनी कांदळवन क्षेत्र संरक्षणाची मागणी केली. या ठिकाणी असणारे खासगी कांदळवनाचे सर्वेक्षण करून वनखात्याकडे हस्तांतरित करण्यात आले नाही, असे सांगण्यात आले. या मुद्दय़ावर सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा