मच्छीमारांना अत्याधुनिक नौकेवर प्रशिक्षण मिळणार
रायगड मच्छीमारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मच्छीमारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक मासेमारी नौका रायगड जिल्ह्य़ात दाखल झाली आहे. अत्याधुनिक मासेमारी यंत्रणांनी सज्ज असणारी ही राज्यातील पहिली मच्छीमार प्रशिक्षण नौका आहे. मत्स्यप्रबोधिनी असे या नौकेचे नाव असून राष्ट्रीय कृषी विकास संस्थेच्या माध्यमातून ही प्रशिक्षण नौका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. यात तरुणांना सागरी मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी दोन बॅचमध्ये हे प्रशिक्षणवर्ग सुरू असतात. १ जानेवारी ते ३० जून आणि १ जुल ते ३१ डिसेंबर असा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो. प्रत्येक बॅचमध्ये २१ प्रशिक्षणार्थी असतात. यात माशांचे विविध प्रकार, मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांचे प्रकार, बोटींचे इंजिन, त्याची दुरुस्ती, फिश फाइंडर आणि वायरलेससारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर यांचे प्रशिक्षण मच्छीमारांना दिले जाते.
हे प्रशिक्षण देताना प्रात्यक्षिकांसाठी मच्छीमारांच्या लहान यांत्रिक नौकांचा वापर केला जात असे. आता मात्र मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली सुसज्ज नौका उपलब्ध असणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छीमार प्रशिक्षणासाठी मत्स्यप्रबोधिनी या नौकेची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या या नौकेवर प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मच्छीमार प्रशिक्षणासाठी राज्यात उपलब्ध झालेली ही पहिली सुसज्ज नौका आहे. रायगडच्या मत्स्यव्यवसाय विभागाने या संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळून आता ही मत्स्यप्रबोधिनी उपलब्ध झाली असल्याचे साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्य़ात ३ हजार ४४४ यांत्रिकी तर १ हजार ४९९ बिगर यांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ४० हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते. मात्र सुशिक्षित आणि तरुण पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. निसर्गाशी दोन हात करण्यापेक्षा, शासकीय कार्यालयात अथवा खासगी कार्यालयात नोकरी करण्याचा मार्ग या तरुण पिढीने स्वीकारला आहे. त्यामुळे बोटीवर काम करायला माणसे मिळणे कठीण झाले आहे. मासेमारी व्यवसायाला नाखवा आणि खलाशी यांची चणचण भासायला लागली आहे. चांगला पगार देऊनही बोटींवर काम करायला कोणी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
ही बाब लक्षात घेऊन मासेमारी व्यवसायाला अधुनिक तंत्रज्ञानाची साथ देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मच्छीमारांचे शारीरिक श्रम कमी करून, शाश्वत उत्पादन कसे मिळवता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असणारी मासेमारी नौका उपलब्ध करून देण्यात आली आहे.