कोकण किनारपट्टीवर वाढलेले जलप्रदूषण, हवामानाचा लहरीपणा, यांत्रिकी नौकांची वाढलेली संख्या यांचा एकत्रित परिणाम कोकणातील मासेमारीवर होण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ात मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांंत जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात आठ हजार मेट्रिक टन घट झाली आहे. जिल्ह्य़ात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीपाठोपाठ आता मासेमारी व्यवसायही धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

रायगड जिल्ह्य़ाला २१० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे शेतीनंतर मासेमारी हा जिल्ह्य़ातील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. जिल्ह्य़ात ३ हजार ४४४ यांत्रिकी तर १ हजार ४९९ बिगर यांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ४५ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जात असे. आता मात्र हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. २०११ -२०१२ मध्ये रायगड जिल्ह्य़ात ४६ हजार ९१२ मेट्रिक टन असणारे मत्स्य उत्पादन, २०१५ -२०१६ मध्ये घटून ३९ हजार ५३ मेट्रिक टनावर आले आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांंत जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात तब्बल आठ हजार मेट्रिक टनाची घट झाली आहे. पापलेट, सुरमई, िशगाडा, घोळ, शेवंड यांसारख्या माशांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

डिझेलचे वाढते दर, कुशल खलाशी आणि तांडेल यांची कमतरता, परप्रांतीय बोटींचे आक्रमण, पर्सयिन नेट फििशग यांसारख्या समस्या मासेमारी व्यवसायाला आधीच भेडसावत होत्या. आता यात हवामानाचा लहरीपणा आणि वाढते जलप्रदूषण यांची भर पडली आहे. जिल्ह्य़ात गेल्या दोन दशकांत मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण वाढीस लागले आहे. रोहा, महाड, नागोठणे, पाताळगंगा परिसरात रासायनिक कंपन्यांच्या वसाहती तयार झाल्या आहेत.

या रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी खाडय़ांच्या माध्यमातून समुद्रात सोडले जात आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागात जलप्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे. पूर्वी आठ ते नऊ वाव अंतरावर मिळणारी मच्छी आता १५ ते १७ वाव खोल अंतरावर मिळत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात.

कोकण किनारपट्टीवर वाढलेले प्रदूषण, बंदीच्या काळात परप्रांतीय मच्छीमार बोटींकडून होणारी मासेमारी यामुळे जिल्ह्य़ातील मासेमारी उत्पादनात मोठी घट होत आहे. कोकण किनारपट्टीवर विशेषत: खाडय़ांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या अनेक माशांच्या प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पापलेट, सुरमई, िशगाडा, शेवंड, घोळ मासे मिळण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. त्याचबरोबर मत्स्य उत्पादनाची आकडेवारी घेताना स्थानिक मच्छीमार सोसायटीची मदत घ्यावी जेणेकरून उत्पादनाच्या आकडेवारीत अधिक अचूकता येऊ शकेल. डॉ. कैलास चौलकर, अध्यक्ष रायगड जिल्हा कोळी समाज महासंघ

 

गेल्या पाच वर्षांतील मत्स्य उत्पादनाची आकडेवारी

  • २०१० – २०११— ४६ हजार ९१९ मेट्रिक टन
  • २०११- २०१२ — ४६ हजार ९१२ मेट्रिक टन
  • २०१२ – २०१३— ४१ हजार ९८४ मेट्रिक टन
  • २०१३ – २०१४ —४२ हजार ८२५ मेट्रिक टन
  • २०१४ – २०१५ — ४१ हजार २३९ मेट्रिक टन
  • २०१५-२०१६ —- ३ हजार ५३ मेट्रिक टन