पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घातपात
नक्षलवाद्यांनी आज बुधवारी दंतेवाडय़ाच्या बचेली येथे भयंकर स्फोट घडवून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ)ची बस उडवून दिली. यात एका जवानासह चार स्थानिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एकूण सात जवान जखमी झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी जगदलपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. अशातच झालेल्या या हल्ल्यामुळे छत्तीसगड राज्य हादरले आहे.
छत्तीसगड येथे १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात तर १८ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असतानाच बस्तर भागात नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सात दिवसात दुसरा हल्ला केला आहे. आज सकाळच्या सुमारास सीआयएसएफची एक टीम मिनी बसद्वारे नियमित गस्तीकरिता आकाशनगर येथे जात होती. त्यांना परत येताना सहकाऱ्यांसाठी भाजीपाला आणण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. आकाशनगरच्या ६ व्या क्रमांकाच्या वळणावरून बस वळत असतानाच नक्षलवाद्यांनी तिथे पूर्वीच पेरून ठेवलेल्या आयडी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात हेड कॉस्टेबल डी. मुखोपाध्याय यांच्यासह सामान्य नागरिक असलेले बस चालक रमेश पाटकर, मदतनीस रोशन कुमार साहू, ट्रक चालक सुशील वंजारे, मदतनीस जोहन नायक या पाच जणांचा मृत्यू झाला, तर सतीश पठारे, विशाल सुरेश यांच्यासह सात जण गंभीर जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जखमींना बचेली येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बस्तर विभागातील जगदलपूर येथे पहिल्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा उद्या शुक्रवारी आयोजित केली आहे. जगदलपूरपासून दंतेवाडा जवळच आहे. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बस कोसळताच गोळीबार
हा स्फोट इतका प्रचंड होता की बस ८ ते १० फूट उंच उडाली आणि पुन्हा जमिनीवर आदळली. बस खाली कोसळताच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी बसच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. जवळपास अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. त्यानंतर नक्षलवादी माओवाद जिंदाबादच्या घोषणा देत तिथून निघून गेले.