सोलापुरात भाजपचा  राजीनामा दिलेले चार माजी  नगरसेवक आणि एका बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) प्रवेश करण्यासाठी सकाळी शंभरपेक्षा अधिक मोटारींचा ताफा घेऊन हैदराबादकडे रवाना झाले. या सर्वांचा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित सायंकाळी बीआरएस पक्षात प्रवेश सोहळा पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार  लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले या  चार माजी नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय शंभर वर्षे जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीही बीआरएसमध्ये निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे सर्वजण पाचशे कार्यकर्त्यांसह हैदराबादकडे रवाना झाले. सायंकाळी ज्युबिली हिल्स भागातील बीआरएस भवनात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, अर्थंमत्री हरीश राव आदींनी वल्याळ व इतरांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले.

हेही वाचा >>> माढ्याच्या राष्ट्रवादी अभेद्य गडावरील शरद पवारांचे अस्तित्व संपुष्टात, शिंदे बंधुंची अजित पवारांना साथ

गेल्या २७ जून रोजी आषाढी वारीचे निमित्त पुढे करून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह बीआरएस पक्षाचे सर्व आमदार, खासदार व पदाधिका-यांना सोबत घेऊन सोलापूर आणि पंढरपूरला आले होते. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांनी आपल्या सरकोली गावात चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी शेतकरी मेळावा भरवून बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी सहाशे मोटारींचा मोठा ताफा घेऊन चंद्रशेखर राव यांनी केलेला सोलापूर व पंढरपूर दौरा राज्यात चर्चेचा विषय झाला होता.

हेही वाचा >>> काँग्रेस फुटणार नाही पण,भाजपकडून अफवांचे काम – पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

याच दौ-यात चंद्रशेखर राव यांनी सोलापुरात भाजपचे दिवंगत, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी सुरेश पाटील, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जुगनबाई आंबेवाले, सुभाष शेजवाल हे माजी नगरसेवक हजर  होते. या सर्वांना चंद्रशेखर राव यांनी विकासाच्या मुद्यावर बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. यापैकी सुरेश पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला असला तरी पुढील रविवारपर्यंत (१६ जुलै) भूमिका ठरविण्याचे स्पष्ट केले आहे. तर सुभाष शेजवाल यांनी अद्यापि निर्णय घेतला नाही. शहरातील प्रामुख्याने तेलुगु  भाषकांचा पट्टा असलेल्या पूर्वभागाकडे बीआरएस पक्षाने अधिक लक्ष देऊन तेथे बस्तान  बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच पूर्व भागात राहणारे काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी सर्वप्रथम बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. भाजपचे दहा माजी नगरसेवक बीआरएस पक्षात येण्यास इच्छूक असल्याचा दावा सादूल यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five hundred workers including four former bjp corporators joined brs zws
Show comments