वर्धा व वैनगंगा नदीसह प्रमुख सिंचन प्रकल्पांतून जिल्ह्य़ातील ३७ मोठय़ा उद्योगांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बल्लारपूरचा मे. बिल्ट ग्राफिक पेपर मिल व मराठा सिमेंट कंपनीसह पाच उद्योगांचा करारनामा संपलेला असतानाही या उद्योगांकडून पाण्याची उचल केली जात असून, त्यामुळे सिंचन विभागाला आर्थिक भरुदड सहन करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मराठा सिमेंट कंपनीसह पाच मोठय़ा उद्योगांचा करारनामा संपलेला असूनही या उद्योगांकडून पाण्याची उचल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा सिमेंट कंपनीला पकडीगुड्डम या सिंचन प्रकल्पातून ३.०३ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. या कंपनीचा करार १६ जानेवारी २००६ ते १५ जानेवारी २०१२ पर्यंतच होता. हा करार संपून वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असतानाही या उद्योगाकडून पाण्याची उचल सुरूच आहे.
बल्लारपूरचा मे. बिल्ट ग्राफिक पेपर मिल हा उद्योगसमूह वर्धा नदीतून २२.९१ दलघमी पाण्याची उचल करतो. जिल्ह्य़ातील इतर कोणत्याही उद्योगापेक्षा सर्वाधिक पाण्याची उचल ही बल्लारपूर पेपर मिलकडून केली जात असतानाही या उद्योगाचा त्यासाठी करारनामा झालेला नाही. या उद्योगाकडून दूषित पाणी वर्धा नदीत सोडण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहेत. येथील महाऔष्णिक विद्युतनिर्मिती केंद्राकडून इरई नदीतून पाण्याची उचल होत असली तरी त्याबाबत करारनामा झालेला नाही. पडोलीचे महाऔष्णिक विकास महामंडळ वर्धा नदीतून ७.२९ दलघमी पाण्याची उचल करते. २५ सप्टेंबर २००६ ते २४ सप्टेंबर २०१२, असा सहा वर्षांसाठीचा करार असताना आजही या महामंडळाकडून पाण्याची उचल सुरू आहे. विशेष म्हणजे या महामंडळाचा करार संपून नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अशा स्थितीत सिंचन विभागाने महामंडळाला पत्र देऊन पाणीपुरवठा खंडित करणे अपेक्षित असतानाही पाणीपुरवठा होत आहे. चारगाव धरणातून तेथीलच मत्स्यबीज केंद्राला पाणी दिले जात आहे.
या केंद्राचा करार १६ जून २००४ ते १५ जून २०१० पर्यंत होता. करार संपल्यानंतरही या केंद्राकडून पाण्याची उचल सुरूच आहे. गडचांदूरच्या मत्स्यबीज केंद्राला अंमलनाला प्रकल्पातून करार संपल्यानंतर पाणी दिले जात आहे, तर चिमूरच्या शारदा अंबिका पॉवर स्टेशनलाही भिसीपिटीचुवा या प्रकल्पातून पाणी दिले जात आहे. या सर्व उद्योगांकडून फुकटात पाण्याची उचल सुरू असल्याने सिंचन विभागाला आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
वर्धा नदीतून सर्वाधिक उचल
औद्योगिकदृष्टय़ा प्रगतिपथावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात वर्धा, वैनगंगा, इरई व उमा या प्रमुख नद्या असून, अकरा मध्यम व मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील बहुतेक नद्या व सिंचन प्रकल्पांमधून पाण्याची उचल उद्योगांकडून करण्यात येत आहे. यात वर्धा नदीतून सर्वाधिक २१ उद्योग पाण्याची उचल करत आहेत. त्यापाठोपाठ वैनगंगा नदीतून ५, इरई नदी व अंमलनाला धरणातून ३, पकडीगुड्डम, चारगाव धरणांतून प्रत्येकी २ उद्योग पाण्याची उचल करत आहेत. या सर्व उद्योगांनी सिंचन विभागाशी पाणी उचलण्याचा करार केला असून, त्या मोबदल्यात वर्षांकाठी लाखो रुपयांचा महसूल जमा करावा लागतो.