सांगली : मिरजेजवळील राजीवनगर येथे राष्ट्रीय महार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. बुधवारी सकाळी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे (ता. राधानगरी) येथील रहिवासी आहेत.
सरवडे भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला राष्ट्रीय महार्गावरून जात असताना विरूध्द दिशेने येत असलेल्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात जयवंत पवार (वय ४५), कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) आणि सोहम शिंदे (वय १२) या एकाच कुटुंबातील चौघांसह चालक असे पाच जण जागीच ठार झाले, चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही. या अपघातात अन्य तीन जखमी असून यामध्ये एका महिलेचा समावेश असून दोन मुली आहेत. जखमी महिलेची प्रकृर्ती चिंताजनक असून सर्व जखमींना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारीच या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. वाहतूक सुरू झाल्यानंतर 48 तास होण्यापुर्वीच वड्डी गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. बोलेरो मोटार कोल्हापूरच्या दिशेने जात असताना याच मार्गावरून बांधकाकासाठी लागणार्या विटा भरून ट्रॅक्टर येत होता. समोरून येणार्या ट्रॅक्टरवर बोलेरो मोटार जोराने आदळली. यामुळे मोटारीच्या पुढील भाग ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसला. अपघातात मोटारीचा व ट्रॅक्टरच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला होता.
हेही वाचा… मविआत सगळं काही ऑल इज नॉटवेल? भास्कर जाधव म्हणतात, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीने…..”
महामार्गावर असलेले वाहतूक पोलीसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करीत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरूळीत सुरू केली. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल लोखंडे, सहायक फौजदार सुनील शिरसाट, सुमित निर्मळे, अभिजित वाघमारे, दत्ता तोडकर आदींनी मदत कार्य केले.