गॅस्ट्रोचा धुमाकूळ मिरजेत अद्याप सुरूच असून, मंगळवारी पहाटे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. महापालिकेच्या इतिहासात आज प्रथमच शहरातील ४० हजार कुटुंबांचे साथीच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. आजही गॅस्ट्रोने त्रस्त असणारे १४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने अद्याप महापालिकेला शहरातील साथ नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याचे अधोरेखित झाले.
मिरजेच्या विविध भागांत गेल्या आठ दिवसांपासून गॅस्ट्रो, कॉलरा आणि अतिसाराची लागण झाली असून, शेकडो रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या हजारावर पोहोचली आहे. न्यू इंग्लिश स्कूलजवळ राहणाऱ्या अमरीन अमीन शेख या ३८ वर्षांच्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेले आठ दिवस तिच्यावर उपचार करण्यात येत होते.
या महिलेला जुलाब, उलटीचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते असे तिचा नातेवाइकांनी सांगितले. मात्र महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी या रुग्णाचा मृत्यू निमोनियाने झाला असल्याचे सांगत गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याचे फेटाळले. याशिवाय शहरात यापूर्वी झालेल्या चारपकी केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू गॅस्ट्रोने झाला असून अन्य तिघांचे मृत्यू अन्य आजाराने झाले असल्याचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मिरजेत आज घर टू घर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे ३५० कर्मचारी तनात करण्यात आले होते. शहरातील सुमारे ४० हजार कुटुंबांचे घरटी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पाण्याचा वापर चावीचा की हातपंपाचा, नळजोडणी सुस्थितीत आहे की नाही, गटारीतून घेतले आहे का, शौचालय आहे का, रुग्ण कोणी आहे का याची माहिती संकलित करण्यात आली आहे.
महापालिकेच्या इतिहासात अशा पद्धतीचे सर्वेक्षण पहिल्यांदाच करण्यात आले असून, एका दिवसात सुमारे पावणेदोन लाख जनसमुदायाची माहिती महापालिकेने संकलित केली आहे. सर्वेक्षणासोबत औषधाच्या गोळय़ा आणि ओआरएस पाकिटांचे वाटपही करण्यात आले.
दरम्यान, मिरजेत गॅस्ट्रोची साथ पसरली असतानाही महापालिकेचे आयुक्त अथवा महापौर यांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे जाणवत नाही. याबाबत लोकांच्यात क्षोभ दिसून येत आहे. आयुक्त यांनी विचारपूस करण्यासाठी मिरजेत भेटही दिली नाही. गॅस्ट्रोने रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मदन पाटील युवा मंचने एका निवेदनाद्वारे केली आहे. मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा