Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. माळीण आणि तळीये दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या घटनेने राज्य हादरलंय. रात्री ११-१२ च्या सुमारास इर्शाळवाडीत दरड कोसळून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा प्रशासन, पनवेल आणि मुंबई महापालिकेची बचावपथकं रात्रीच इर्शाळवाडीत दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २५ हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. तसेच अनेक जखमी गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा याठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा >> पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली. ते म्हणाले की, “रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
“ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असंही फडणवीस म्हणाले.