नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळील इसार पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ४ जणांचा जागीच तर एका महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. अन्य आठ गंभीर जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सरोजा रमेश भोई (वय ३२, रा. पवनसिंगनगर मेहकर) गलीअम्मा कल्याण भोई (वय ४०, रा. गेवराई जि.बीड) वेजल कल्याण भोई (वय ७ महिने), पुंडलिक बळीराम कोल्हटकर (वय ७० रा.माळसावरगाव ता.भोकर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा >>> ‘धावत्या रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, मग मुलीने रेल्वेबाहेर मारली उडी’, थरकाप उडवणारा VIDEO
विद्या संदेश हटकर (वय ३७) या प्रवासी महिलेस उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत मुदखेड येथील लक्ष्मी राजू गडमठ (वय ३०), दीपा महेश गडमठ (वय २०), सोहम संदेश हटकर (वय ११), सोनाक्षी संदेश हटकर (वय १३), शोभा भांगे (वय ५०) शेख मदीन (वय ४५), पूजा गडमठ (वय ४०), पल्लवी विजय (वय ३०) हे जखमी झाले. यातील लक्ष्मी गडमठ, सोहम हटकर, सोनाक्षी हटकर या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की, रस्त्यावर रक्तामांसाचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच मुदखेड व मुगट येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी मृत झालेल्या चौघांना मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणी मुदखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.