नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत दुचाकी वाहने आल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पोलीस अधिका-यावर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल नवरात्रोत्सव मंडळाच्या पाच तरुण कार्यकर्त्यांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मात्र अन्य ४५जणांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
मरगू कोंडिबा निंबाळकर (३५), अनिल रमेश चौगुले (२८), शंकर ईरप्पा निंबाळकर (२३), श्रीशैल गुंडप्पा टेळे (२६) व मरगू अण्णाप्पा इरागोटे (२६, सर्व रा. मड्डी वस्ती) अशी सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना प्रत्येकी साडेतीन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अन्य ४५ आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.
शहरातील भवनी पेठेतील मड्डी वस्ती परिसरात २८ सप्टेंबर २००९ रोजी नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या मिरवणुकीप्रसंगी एका बाजूने दुचाकी वाहनांसाठी पोलिसांनी रस्ता दिला होता. परंतु विजय भवानी मंडळाच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने अडविली. त्यातून वाद झाला असता तेथे पोलीस पथक धावून आले. परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीम व दगडफेक करून जोडभावी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एम. नदाफ व सहायक पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह पोलीस शिपाई विलास राठोड, रोहित बगले आदींना जबर जखमी केले होते. या वेळी हल्लेखोर तरुणांनी पोलिसांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नदाफ यांनी गुन्हय़ाचा तपास करून सर्व ५० आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. रामदास वागज यांनी काम पाहिले, तर आरोपींतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी बचाव केला.

Story img Loader