अबूजमाडच्या जंगलात आमचे राज्य आहे, असे सांगत आजवर प्रशासकीय यंत्रणेला शिरकाव करू न देणाऱ्या नक्षलवाद्यांच्या जाचाला कंटाळून या माड परिसरातील सुमारे पाच हजार आदिवासींनी स्थलांतर करून नारायणपूरला आश्रय घेतला आहे. सलवा जुडूमच्या अत्याचारांमुळेच आदिवासी स्थलांतर करतात, असा दावा करणारे नक्षलवादी व त्यांचे समर्थक या स्थलांतरणावर मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत.
नारायणपूर या जिल्हा मुख्यालय असलेल्या शहराच्या बाहेर पडले की, शांतीनगर व गुड्डीपारा ही वस्ती लागते. या भागाला ‘मुखबिर टोला’ असेही म्हटले जाते. सुमारे पाच हजार आदिवासी वास्तव्य करून असलेल्या या भागाला भेट देऊन आदिवासींना बोलते केले की, नक्षलवाद्यांच्या छळाच्या अनेक कथा समोर येतात. अबूजमाड पहाडावर प्रशासनाचे अस्तित्व शून्य आहे. या भागावर पूर्णपणे नक्षलवाद्यांचा अंमल आहे. येथेही नक्षलवादी आदिवासींचा छळच करतात, हे या कथा ऐकल्या की स्पष्टपणे जाणवते.
अबूजमाड भागातील आदिवासींनी शहरात जायचे नाही, असा नक्षलवाद्यांचा फतवा आहे. तो न पाळणाऱ्या आदिवासींना मारहाण करणे, प्रसंगी गोळ्या घालणे, असे प्रकार नक्षलवादी सर्रास करतात. आदिवासी शहरात गेला की, त्याचा पोलिसांशी संबंध आला, असे गृहीत धरणाऱ्या नक्षलवाद्यांच्या छळाला कंटाळून हजारो आदिवासींनी स्थलांतर करीत नारायणपूरला आश्रय घेतला आहे. हे आदिवासी माडिया जमातीचे आहेत.
याच वस्तीत संतू राम नुरेटीची भेट झाली. २००८ मध्ये पहाडावरचे मूरनार हे गाव व २० एकर शेती सोडून येथे स्थायिक झालेला संतू आता मजुरी करून पोट भरतो. केवळ बाजारासाठी नारायणपूरला आला म्हणून संतूवर खबरी असल्याचा संशय घेऊन नक्षलवाद्यांनी मारहाण केली. याच संशयावरून नक्षलवाद्यांनी गावच्या सरपंचासह तिघांची हत्या केली. त्यामुळे १२५ घरांचे हे गावच स्थलांतरित झाले. अबूजमाड पहाडावर कधीच पोलीस येत नाहीत. तरीही आमच्यावर संशय घेण्यात आला, असे संतू म्हणाला. दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या या गावात शेतीतही फारसे पिकत नाही. तरीही नक्षलवाद्यांना जेवण द्यावेच लागायचे. मग आम्ही काय खायचे, असा प्रश्न सर्वासमोर उभा ठाकला व स्थलांतरणाचा निर्णय घेतला, असे तो म्हणाला.
याच माड परिसरात वाडापेंदा गावातील मनिराम वड्डे या वस्तीत राहतो. त्यानेही २००९ मध्ये स्थलांतर केले. खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याच्यावर गोळी झाडली. ती हातातून आरपार गेली. जीव वाचवण्यासाठी गावातून जखमी अवस्थेत पळलेला मनिराम थेट ५० किलोमीटर चालत नारायणपूरला आला. मागाहून त्याचे कुटुंब आले. माझी ५० एकर शेती, गाई, म्हशी नक्षलवाद्यांना बघवत नव्हत्या. आता शेती तशीच पडून आहे, तर गाईम्हशी नक्षलवाद्यांनी फस्त केल्या, असे मनिराम सांगतो. या वस्तीत मातीच्या झोपडय़ा उभारून राहणाऱ्या आदिवासींना सरकारची ३५ रुपयात धान्य हीच एकमेव योजना जगण्याचा आधार आहे. या सर्व आदिवासींनी मजुरी करून झोपडय़ा उभारल्या आहेत. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ यांना मिळत नाही. निवडणुकीच्या काळात अबूजमाड पहाडावरील २६ मतदान केंद्रे नारायणपूरजवळच्या कृष्णारला एकाच ठिकाणी स्थापन केली जातात.
तेथे जाऊन हे आदिवासी मतदान करतात. त्यामुळे अबूजमाडलाही मतदान होते, हे प्रशासनाला सहज सिद्ध करता येते. या राज्यात सलवा जुडूममुळे हजारो आदिवासींना स्थलांतरित व्हावे लागले, असा आरोप नक्षलवादी नेहमी करतात. त्यांच्या समर्थकांनी हाच मुद्दा समोर करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता नक्षलवाद्यांमुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या या आदिवासींच्या बाजूने मात्र कुणीही बोलायला तयार नाहीत, तर त्यांचे समर्थकही मूग गिळून गप्प बसले आहेत.
नक्षली जाचामुळे अबूजमाडच्या पाच हजार आदिवासींचे स्थलांतर
अबूजमाडच्या जंगलात आमचे राज्य आहे, असे सांगत आजवर प्रशासकीय यंत्रणेला शिरकाव करू न देणाऱ्या नक्षलवाद्यांच्या जाचाला कंटाळून या माड परिसरातील सुमारे पाच हजार
First published on: 16-11-2013 at 12:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five thousand naxalite fed up tribal migrates from abusmad of gadchiroli to else where