पतंजलीच्या उद्यानासाठी पाच हजार रोपे रवाना

हरिद्वार येथील पतंजली आश्रमात संपूर्ण देशातील स्थानिक जातींच्या वनस्पतींचे उद्यान उभारण्यात येत असून त्यासाठी आवश्यक रोपाच्या उपलब्धतेसाठी आश्रम व्यवस्थापनाने थेट गव्हे-दापोली येथील कोपरकर नर्सरीची निवड केली आहे. या रोपवाटिकेतून नुकतीच पावणेपाचशे प्रकारची पाच हजार रोपे हरिद्वार येथे पाठवण्यात आली असून यामुळे कोकणचा रोपवाटिका क्षेत्रातील डंका थेट देशाच्या उत्तर सीमेपर्यंत पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. गव्हे येथील डॉ. श्रीधर आणि सुहासिनी कोपरकर हे दाम्पत्य गव्हे- दापोली येथे गेली ४० वष्रे रोपवाटिका चालवत आहेत. त्या वेळी येथे प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ आदी प्रमुख फळझाडांच्या रोपांची निर्मितीच करण्यात येत होती. फळबाग लागवडीसाठी मोठय़ा प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि त्यातून स्थानिक वनस्पतींकडे होत चाललेले दुर्लक्ष याचा विचार करून सुहासिनी कोपरकर यांनी ११९६ मध्ये स्थानिक वनस्पतींच्या रोपांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यातून ताम्हण, वारस, शिवण, किंजळ अशा अनेक जंगली वृक्षांची रोपे तयार झाली. सुरुवातीची चार वष्रे या रोपांना अतिशय कमी प्रतिसाद मिळाला.

दरम्यान संपूर्ण देशभर फिरून विविध वनस्पतींचे संकलन करण्याचा निर्णय कोपरकर दाम्पत्याने घेतला. त्यातही दक्षिण भारतासह पश्चिम घाटातील विविध वनस्पतींचे संकलन करण्यात त्यांना चांगलेच यश आले. त्यानंतर या रोपवाटिकेत एक हजारहून अधिक वनस्पतींची सुमारे दहा लाख रोपे दरवर्षी तयार करण्यात येऊ लागली. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधता तसेच येथील वनस्पतींच्या रोपावस्थेतील बदल याचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरातील जीवशास्त्राचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने त्यांच्या रोपवाटिकेला भेट देऊ लागले. साहजिकच पतंजली आश्रमाने संपूर्ण देशातील वनस्पतींचे उद्यान करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुहासिनी आणि डॉ. श्रीधर कोपरकर यांनी केलेल्या वनस्पती संकलनाची माहिती यांच्यापर्यंत पोचण्यास वेळ लागला नाही. पतंजली आश्रमाचे संस्थापक सदस्य खुद्द आचार्य बाळकृष्ण यांनी दूरध्वनी करून कोपरकर यांच्याशी रोपांबाबत चर्चा केली. त्यात ५० फळझाडांसह पावणेपाचशे प्रकारच्या स्थानिक वनस्पतींची पाच हजार रोपं पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १६ टनांचे दोन ट्रक भरून रोपं गव्हे येथून हरिद्वारला नुकतीच पाठवण्यात आली. कॉप्स नर्सरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या रोपवाटिकेच्या कामगिरीने कोकणचा डंका संपूर्ण देशात पसरण्यास मदत झाली आहे.

Story img Loader