सावंतवाडी : मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघे जणांनी जीव गमावला आहे. दोघेजण बचावले असून एक जण गंभीर आहे. तारकर्ली समुद्रात पुणे येथील पर्यटक अंघोळ करण्यास जात असताना तेथील नागरिकांनी त्यांना खबरदारी घेण्याची सुचना केली होती मात्र ती धुडकावून लावत ते खोल समुद्रात गेले. या पाच बुडालेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला. पण दोघांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर आहे. अन्य दोघे जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आम्ही सुखरुप असलेल्याकडे चौकशी करत असल्याचे सांगितले.

पुणे हडपसर येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली. या दुर्घटनेतील मृतांची नावे रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) दोन्ही रा. हडपसर, हवेली पुणे अशी आहेत. तर दुर्घटनेतील तिसरा ओंकार भोसले या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे – हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे (२०), ओंकार अशोक भोसले (२४) उपचार, रोहित बाळासाहेब कोळी (२१) मयत, शुभम सुनील सोनवणे (२२) मयत हे युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलें होते.

सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आला.

अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तात्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनावणे यांना मयत घोषित केले. मात्र ओंकार भोसले हा गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्ट चे कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.या प्रकरणी मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि त्यांची टीम तपास करत आहेत.

Story img Loader