आपल्या छोटया सायकलने गावातील किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी जात असलेल्या पाच वर्षीय बालकाला तेंदूपत्ता वाहनाने चिरडल्याची घटना तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली. वाहनाच्या मागच्या चाकात आल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला . यश योगीराज शेंडे ( ५ ) रा . लंजेरा ता . तुमसर जि.भंडारा असे मृताचे नाव आहे. शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास यश आपली छोटी सायकल घेऊन गावातील किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी जात होता. त्यावेळी गावातून जाणाऱ्या पिटेसुर ते जांब रस्त्यावर तेंदूपाने भरलेले पिकअप वाहन ( एमएच ४० वाय ८२३९ ) वेगाने जात होते. त्यावेळी यश ला या वाहनाने धडक दिली . तो सायकालसह वाहनाच्या मागच्या चाकात आला आणि जागीच ठार झाला.

अपघात झाल्याचे माहित होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला. या अपघाताची माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चिमुकल्याच्या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे .

Story img Loader