नगरःस्वातंत्र्यदिनी नगर शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात किल्ल्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या लष्कराचे जवान व भिंगार कॅम्प पोलीसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतले. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले”; राज ठाकरेंचा टोला, म्हणाले, “पंतप्रधानांनी…”

नगर शहराजवळील भुईकोट किल्ला जसा ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध आहे तसाच तो स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा साक्षीदार आहे. याच किल्ल्यात पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या दिग्गज स्वातंत्र्यसेनानींना ब्रिटिशांनी कैदेत ठेवले होते. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ याच किल्ल्यात लिहिला. स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यात स्वातंत्र्यदिनीच देशविरोधी घोषणा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय उत्सवावेळी ऐतिहासिक भुईकोट किल्ला प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुला ठेवला जातो. किल्ला सध्या लष्कराच्या ताब्यात आहे. राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी किल्ला पाहण्यासाठी नगरकरांसह शालेय विद्यार्थी मोठी गर्दी करत असतात. राष्ट्रीय नेत्यांना कैदेत ठेवले त्या खोल्याही पाहण्यासाठी भेटी दिल्या जातात.

हेही वाचा >>> टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “त्यांनी आधी…”

काल स्वातंत्र्यदिनीही अलोट गर्दी होती. दुपारी तीनच्या सुमारास किल्ल्याच्या हत्ती दरवाजाजवळ, दर्ग्यालगत पाच मुलांच्या टोळक्याने देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी केली. त्यावेळी तेथे बंदोबस्त असलेले लष्करी जवान प्रशांत कुमार, पवनसिंग, दिलीप भीषण, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन धोंडे, व्ही. एन. राठोड महिला पोलीस एस. बी. साळवे, पवार यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघे पळून गेले. नंतर सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, संदीप घोडके, रवींद्र दहिफळेर दीपक शिंदे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. परवेज इजाज पटेल (२१, अमिना मशिदजवळ, आलमगीर, भिंगार) व अरबाज शेख (रा. कोठला, नगर) या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यासंदर्भात बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटचे हवालदार प्रशांतकुमार श्रीचंदेश्वरसिंग यांनी फिर्याद दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five youths in custody for chanting anti national slogans at historic bhuikot fort on independence day zws