अलिबाग : कोकण किनारपट्टीवरील निर्मनुष्य बेटे आणि सागरी किल्ल्यांवर येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहण होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात दहा ठिकाणी या निर्णयानुसार ध्वजारोहण केले जाणार आहे.
सागरी सुरक्षेचे महत्व ओळखून शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर मराठा आरमाराची उभारणी केली होती. याच उद्देशाने कोकण किनारपट्टीवर असलेल्या बेटांवर सागरी किल्ल्यांची उभारणी केली होती. यातील बहुतांश किल्ले हे आजही सुस्थितीत उभे आहेत. ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्टीकोनातून या किल्ल्यांचे महत्व अबाधित आहे. ही बाब लक्षात घेऊन येत्या २६ जानेवारीला कोकण किनारपट्टीवर एकूण ६२ ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार आहे.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बेटांवर वेळोवेळी भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा. आणि वर्षातून किमान दोन वेळा त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार आता कोकणात २६ जानेवारीला या सर्व ठिकाणी ध्वजारोहण करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
ज्या ठिकाणी सहज पोहोचणे शक्य आहे. अशा ठिकाणी ध्वजारोहण करण्यात कुठलिही अडचण येणार नाही. मात्र ज्या बेटांवर आणि किल्ल्यांवर कोणी जात नाही अशा ठिकाणी पोहचणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील उंदेरी किल्ल्यावर वर्षभरात कोणीही फिरकत नाही. या ठिकाणी बोटी लागण्यासाठी जेटी उपलब्ध नाही. पावसाळ्यात रानटी झुडपे उगवलेली असतात. अशा परिस्थितीत किल्ल्यावर जाऊन तिथे साफसफाई करून, ध्वजारोहण करण्यासाठी यंत्रणांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा…Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
पर्यटकांची आणि स्थानिकांची वर्दळ असलेली बेटे.
एलिफंटा, खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, कोर्लई, जंजिरा, सिंधुदुर्ग, जयगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग निवती, तारकर्ली, दाभोळ, मालवणी या ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार आहे. पर्यटक आणि स्थानिकांची वर्दळ असल्याने या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात फारशी अडचण येणार नाही.
निर्मनुष्य बेटे.
रायगड जिल्ह्यातील उंदेरी, गर्ल आयलॅण्ड अर्थात कासा खडक, रॅट आयलॅण्ड यासारख्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. त्यामुळे निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करणे आव्हानात्मक ठरणार आहे.