झेंड्याच्या कारणावरून शहरातील जुनी गल्ली भागातील दोन गटात गुरूवारी रात्री अचानक वाद झाला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. दगडफेकीत अनेक दुकानांसह वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटातील दोनशेहून अधिक लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील जुनी गल्ली भागातील प्रमुख चौकात शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक दोन गटात झेंड्याच्या कारणावरून वाद उफाळून आला़ वादाचे रूपांतर दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ भर रस्त्यातील पानटपरीचे नुकसान करण्यात आले तर दगडफेकीत दोन ते तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. शुक्रवारी दिवसभरही या परिसरात पोलिसांचे पथक लक्ष ठेवून होते.

दरम्यान पोलिसांच्यावतीने हनुमंत म्हेत्रे यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले की, दोन्ही गटातील जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी बेकायदेशीररीत्या एकत्र येऊन झेंडा लावण्याच्या कारणावरून एकमेकांवर दगडफेक करून दुचाकींचे तसेच घरांचे नुकसान करून लोकांमध्ये दहशत पसरविल्याचे म्हटले आहे. त्यानुसार दोन्ही गटाच्या दोनशे ते अडीचशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गटातील आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत विजय चौक येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून तक्रारी होऊन घराच्या दारावर तसेच पत्र्यावर दगडफेक केल्याचे म्हटले आहे. त्यावरून कृष्णा प्रदीप साळुंके, योगेश दीपक तुपे, विशाल, एस.के.कदम, अविनाश मोरे, बालाजी मोरे, गणेश माने, सचिन मडके, नागेश, विकास चांदणे याचा भाचा, सागर राजा साळुंके यांच्यासह इतर 12 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर योगेश तुपे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विजय चौक येथील हॉटेलमध्ये तो बसला असता हल्लेखारांनी त्याला दर्गा रोडकडे घेऊन जाऊन झेंड्याच्या कारणावरून चाकूने जखमी केले तसेच पानटपरी ढकलून देऊन, घरावर दगडफेक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरून तौफीक शेख, शाहरुख शेख, जग्गू मुजावर, युसूफ पठाण यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flag is the reason behind usmanabad clashes